प्रतिष्ठा न्यूज

जत पूर्व भागातील २०० विद्युत खांब वादळी वाऱ्याने पडले; विद्युत पुरवठा तात्काळ पूर्ववत करा- तुकाराम बाबा महाराज; वीज पुरवठा खंडित झालेल्या गावांना भेटी दिल्या

प्रतिष्ठा न्यूज
जत/प्रतिनिधी:- जत तालुक्यात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. विजेचे खांब पडल्याने आजही जत पूर्व भागातील अनेक गावातील वीज गायब आहे. वीज नसल्याने ज्या भागात पाणी आहे तेथेसुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान संख महावितरण समोर आहे. जत पूर्व भागातील खंडित झालेला विद्युत पुरवठा तात्काळ पूर्वरत करावा यासाठी अन्य तालुके व जिल्ह्याततून अधिकारी, कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे.

हभप तुकाराम बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील अनेक गावांना भेटी दिल्या. भेटी दरम्यान ग्रामस्थांनी तुकाराम बाबा यांच्याकडे तक्रारीचा पाढाच वाचला. आठ दिवस झाले लाईट गायब आहे, हाल सुरू आहेत. कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या या तक्रारी घेत हभप तुकाराम बाबा महाराज यांनी संख महावितरण कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी जत पूर्व भागात २०० हुन अधिक पोल वादळी वाऱ्याने कोलमडून पडले आहेत. प्रथम मेन लाइनचे पोल उभा केले जात आहेत ते होताच अन्य पोल उभा केले जातील. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने वेळ लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशी परिस्थिती असली तरी लवकरात लवकर पोल उभारून वीज पुरवठा सुरळीत करू अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी हभप तुकाराम बाबा महाराज यांना दिली. यावेळी बिरू कुळाल, सदाशिव थोरात, बाळू थोरात, मल्हारी थोरात, नामदेव कुळाळ, भगवंत राठोड, मल्लु राठोड, रामचंद्र राठोड, सदाशिव राठोड, ऋषी दोरकर, पिंटू मोरे, महांतेश स्वामी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
रायगडप्रमाणे जतला सेवा द्या.
दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या जत पूर्व भागाला मागील आठवडयात वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला. अनेकांच्या घरावरील, दुकानावरील पत्रे उडून गेली. झाडे, विजेचे पोल कोलमडून पडले. अनेक गावातील वीज गायब झाली. आठवडा होत आला तरी अनेक गावांत वीज आलेली नाही. लोकांचे हाल होत आहेत. प्यायला पाणी नाही, घरात वीज नाही अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे, ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. रायगडला चक्रीवादळ आल्यानंतर जतचे वीज कर्मचारी दोन दोन महिने त्या भागात होते. आता जतवर ही बिकट वेळ आली आहे तेव्हा रायगडला जसे बदली कर्मचारी बोलावून घेवून वीज सेवा सुरू केली तसेच जत पूर्व भागात करावे, पोल उभारण्यासाठी अन्य तालुके, जिल्हयातील अधिकारी, कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी हभप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.