प्रतिष्ठा न्यूज

समाजवादी पार्टी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ३५ जागा लढविणार ; २ जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रीपेड मीटर्सविरोधी आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज
मुंबई दि. १५ – “ आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये पक्षाचे जेथे उत्तम काम, उत्तम जनाधार, संघटन व प्रभावक्षेत्र आहे अशा किमान ३५ जागा लढवण्यात येतील, असा निर्णय समाजवादी पार्टीच्या मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महावितरण कंपनी आणि राज्य सरकार राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांवर प्रीपेड मीटरच्या मार्गाने ग्राहकांची विनाकारण आर्थिक लूट करणारा आणि खाजगीकरणाला प्रोत्साहन देणारा निर्णय घेत आहे. त्या निर्णयाच्या व प्रीपेड मीटर्सच्या विरोधात मंगळवार दि. २ जुलै रोजी संपूर्ण राज्यभर समाजवादी पार्टीच्या वतीने सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी आणि त्याचबरोबर कांही तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.” अशी माहिती समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिलेली आहे.

समाजवादी पार्टीचे सर्व राज्य पदाधिकारी, राज्य कार्यकारीणी सदस्य, जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख यांचे संयुक्त बैठक मुंबई येथील बॅलार्ड इस्टेट येथील समाजवादी पार्टी मुख्य कार्यालयामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये समाजवादी पक्षाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकामध्ये उत्तर प्रदेश मध्ये लोकसभेच्या ३७ जागा जिंकून जे यश मिळवले आणि देशामधील पक्ष लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवला, त्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेश समाजवादी पार्टी यांचे अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये समाजवादी पार्टीने एकही जागा न लढविता ‘संविधान बचाव, तानाशाही हटाव’ भूमिकेतून राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीस मदत केली, प्रभाव असलेल्या ठिकाणी प्रचंड संख्येने मतदान घडवून आणले आणि महाविकास आघाडीच्या यशामध्ये वाटा उचलला, याबद्दल राज्यातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुका राज्यामध्ये निश्चितपणाने सत्तापालट घडवणाऱ्या ठरतील, असा विश्वास राज्य कार्यकारिणीने एक मताने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे प्रभावक्षेत्र असलेले विधानसभा मतदारसंघांबाबत तपशीलवार चर्चा झाली आणि अशा ३५ विधानसभा मतदारसंघांमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात याव्यात, असा निर्णय झाला आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार मा. अबु आसिम आझमी यासंदर्भात पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अखिलेशजी यादव यांच्याशी चर्चा करणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

महावितरण कंपनी आणि राज्य सरकार महाराष्ट्रातील सर्व सव्वा दोन कोटी वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार अशी योजना निश्चित करण्यात आलेली आहे. वास्तविक दरमहा ३०० युनिट्सपेक्षा कमी वीजवापर करणाऱ्या सर्वसामान्य २ कोटी ५ लाखांहून अधिक ग्राहकांना या प्रीपेड मीटरची गरजच नाही. तरीही या योजनेमुळे या सर्वसामान्य वीज ग्राहकांवर किमान 25 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा लादण्यात येणार आहे व या रकमेची परतफेड ग्राहकांना किमान ३० पैसे प्रति युनिट दरवाढीच्या रूपाने करावी लागणार आहे. सध्याचे २६०० व ४००० रु. दराचे मीटर स्मार्ट, पुरेसे व सुस्थितीत असतानाही हे १२,००० रु. दराचे स्मार्ट मीटर्स केवळ खाजगीकरणास मदत करण्यासाठी आणि राज्यात येणाऱ्या खाजगी वितरण परवानाधारकांच्या सोयीसाठी लावण्यात येत आहेत असा आरोप समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आलेला आहे. ग्राहकांच्या वरील अनावश्यक भुर्दंड रद्द झाला पाहिजे आणि त्याचबरोबर दुप्पट दराने मंजूर करण्यात आलेल्या टेंडर्सची चौकशी व कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे अशीही मागणी या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तातडीने येत्या आठ दिवसांत राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदा घेण्यात येतील. पार्टीच्या वतीने व विविध स्थानिक संघटनांच्या वतीने राज्य सरकारला इशारा निवेदन देण्यात येईल. राज्य विधानसभेला जागे करण्यासाठी संपूर्ण राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये आणि शक्य त्या तालुक्यांच्या ठीकाणी मोर्चा, धरणे, निदर्शने इत्यादी विविध मार्गाने प्रीपेड मीटर विरोधी आंदोलन मंगळवार दिनांक २ जुलै रोजी एकाच दिवशी करण्यात येईल, असाही निर्णय घेण्यात आलेला आहे. अशीही माहिती या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आलेली आहे.

मुंबई येथे झालेल्या या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रताप होगाडे होते. या बैठकीमध्ये पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, प्रधान महासचिव परवेझ सिद्दिकी, महासचिव डॉ. अब्दुल राऊफ, डॉ. विलास सुरकर, राहुल गायकवाड, श्रीमती साजिदा निहाल अहमद, कल्पना गंगवार, अनिस अहमद इत्यादी प्रमुखांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस रमेश शर्मा, दीपक चिमणकर, लियाकत खान, याकूब पठाण, फैसल खान, हैदर पटेल, जावेद खान, इब्राहिम खालिक, फारुक पाशा, नबी सिपोराकर, शाहूराज खोसे, नामदेव तिकटे, एडवोकेट शिवाजी कांबळे, अफजल पठाण, रईस बागवान, गुड्डूभाई काकर, मुस्तकीन डिग्निटी, शानेहिंद निहाल अहमद, इमरान चौधरी, साधना शिंदे, बी डी यादव, सहदेव वाळके, दिलावर खान, विष्णू गोडबोले, बब्बू खान, अबू डोंगरे, मुकुंद माळी, जितेंद्र सतपाळकर, प्रकाश लवेकर, कुमार राऊत इत्यादी राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्रमुखांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.