प्रतिष्ठा न्यूज

चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करा.. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची सूचना.. आमदार गाडगीळ यांच्या पुढाकाराने आयोजित आढावा बैठकीचा परिणाम

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. २३ : चिंतामणीनगर (माधवनगर रोड) येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम गेले काही महिने रेंगाळले आहे. परंतु आता त्या कामाला गती मिळेल असे दिसते. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पुढाकारामुळे या संदर्भात शनिवारी आढावा बैठक झाली. त्या बैठकीत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी कोणत्याही परिस्थितीत १५ ऑगस्टपूर्वी पुलाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
चिंतामणीनगर येथील उड्डाण पुलाचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रोजचे जाणे येणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सातत्याने आमदार गाडगीळ यांच्याकडे या पुलाच्या कामाला गती द्या आणि पूल तातडीने पूर्ण करायला सांगा असा आग्रह धरला होता. आमदार गाडगीळ यांनीही या पुलाच्या कामाला गती मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शनिवारी या संदर्भात आढावा बैठक घेण्याची विनंती पालकमंत्री खाडे यांना केली त्यानुसार डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यामध्ये पुलाचे काम रेंगाळण्याची कारणे, निधीची उपलब्धता इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा झाली.
जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या या आढावा बैठकीस आमदार गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, रेल्वेचे कार्यकारी अभियंता शिंदे, ठेकदार रोहन पाटील यांच्यासह व्यापारी, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे यांनी या बैठकीत पुलाचे काम संथ गतीने होत असल्यामुळे या भागातील नागरिकांची अत्यंत गैरसोय होत असल्याचे सांगितले. तसेच वाहतुकीचीही मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे या पुलाचे काम संबंधित यंत्रणेने १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करावे. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्याकडील निधी रेल्वे विभागाला वर्ग करावा, अशा सूचनाही पालकमंत्री खाडे यांनी बैठकीत दिल्या.
आमदार गाडगीळ यांनी या बैठकीत पुलाचे काम तातडीने व्हावे अशी आग्रही भूमिका घेतली.ते म्हणाले, या पुलाचे काम रेंगाळल्यामुळे सांगली -माधवनगर, बुधगाव,बिसूर तसेच सांगली- तासगाव, सांगली -विटे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. या पुलाच्या अलीकडे -पलीकडे आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांचेही हाल होत आहेत. त्यामुळे या पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे आणि त्यावरून वाहतूक सुरु करावी अशी नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने आता अजिबात चालढकल न करता या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे.
पालकमंत्री खाडे यांच्या सूचना तसेच आमदार गाडगीळ यांचा पाठपुरावा यामुळे आता या पुलाच्या कामाला निश्चितच गती येईल अशी चिन्हे दिसत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.