प्रतिष्ठा न्यूज

सावळजच्या अंध समीक्षा माळीचें नेत्रदीपक यश दहावीत 73% गुण…आदर्शवत कामगिरी पण कौतुकापासून वंचित

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : सावळज येथील अंध विद्यार्थिनी समीक्षा अनिल माळी हिने अडचणीवर मात करून जिद्दीने डोळस बनता येते हे दाखवून दिले आहे,दृष्टीहिन असलेल्या समीक्षाने दहावीच्या परीक्षेत ७३ टक्के गुण मिळवून अंधकारमय जीवनात गुणवत्तेचा प्रकाश निर्माण केला आहे.मात्र या डोळस समाजमनाला झापड आल्याने नेत्रदीपक कामगिरी करणारी समीक्षा कौतुकापासून वंचित राहिली आहे,ही दुर्दैवाची बाब आहे.अंध अथवा दिव्यांग मुलांना रोजचे जीवन जगणे हेच एक मोठे आव्हान असते त्यांना थोडे प्रोत्साहन आगि पाठिंबा मिळाला,तर त्यांच्या जीवनातील अंध-कार दूर होऊ शकतो.हिच गोष्ट लक्षात घेऊन सावळज मधील माळीनगर येथील माळी कुटुंबियांनी दृष्टीहिन समीक्षाच्या रुपाने दाखवून दिले आहे.लहानपणापासून ९० टक्के अंधत्व असताना घरातील बेताचीच आर्थिक परिस्थितीवर मात करून जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर अंध समीक्षाने शिक्षण मंदिराच्या
पायऱ्या चढल्या आहेत.तिने पहिली ते चौथी माळीनगर जिल्हा परिषद शाळेत तर पाचवी ते सातवी सावळज जिल्हा परिषद शाळेत तसेच आठवी ते दहावी शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात घेतले.यासाठी तिला प्रत्येक वेळी नवी प्रेरणा, आत्मविश्वास,बळ मिळावे या उद्देशाने आजपर्यंत संघर्षाच्या काळात पालक, शिक्षक,मैत्रिनी समीक्षाच्या मदतीसाठी उभे राहिले.यांच्या प्रोत्साहनामुळे तिने सेमी इंग्रजी या अवघड माध्यमातून दहावीच्या परीक्षेत लेखनिकाच्या मदतीने सर्वसामान्यात वावरुन असामान्य कामगिरी करून उज्वल यश मिळवले आहे.वास्तविक अंध विद्यार्थी ब्रेल लिपीच्या माध्यमातून शिक्षण घेतात पण सावळजसारख्या ग्रामीण भागात दिव्यांगांची शाळा नसल्याने समीक्षा ही सर्वसामान्य
विद्यार्थ्यांप्रमाणे स्थानिक शाळेतूनच शिक्षण घेत राहिली.सर्व नियमित विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या समीक्षाने शिक्षकांनी शिकवलेल्या केवळ शाब्दिक माहितीच्या आधारे, शिकवणी शिवाय मोबाइलवरुन अभ्यास शोधून घेऊन तो ऐकून दहानीच्या कठीण परीक्षेत ५०० पैकी ३६५ गुण मिळविले आहेत.
पालकांची साथ… अडचणीवर मात… अंध मुले म्हटले की,पालक हताश होतात.पण,माळी कुटुंबियांनी आर्थिक परिस्थिती नसताना ही वैद्यकीय उपचारासाठी मोठी धडपड केली. अखेर समीक्षाची दृष्टी बनून तिला आत्मविश्वास,बळ देऊन शिकन्यासाठी प्रोत्साहन दिले.विशेष करून त्यासाठी तिच्या वडिलांनी मोलाचे कष्ट घेतले. त्यामुळे तीने ही पालकांच्या साथीने जिद्द,चिकाटीच्या जोरावर अनेक अडचणींवर मात करीत नेत्रदीपक यश संपादन केले.वडिलांच्या व कुटुंबाच्या कष्टाचे चीज करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.
यशाचे वाटेकरी… अन् अधिकारी बनण्याचे स्वप्न
कष्ट,चिकाटी,जिद्दीने संघर्ष करून अंधत्वावर मात करीत दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल समीक्षाचे कौतुक करताना ती यशात अनेकांचा वाटा असल्याचे सांगते यामध्ये पालकांचा विश्वास,मेहनत, प्रोत्साहन,आजपर्यंत संघर्षाच्या काळातील मार्गदर्शक सर्व शिक्षक, कायम मदतीला हात देणाऱ्या मैत्रीणी तसेच विशेष दहावीची कठीण परीक्षेत लेखनिक म्हणून मधुरा प्रदीप कुलकर्णीने केलेले सहकार्य या सर्वांचा यशात वाटा असल्याचे सांगते.त्यामुळे गुणवत्तेच्या जोरावर भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनण्याचे तिचे स्वप्न साकार करण्यास नियती रोखू शकणार नाही,असा आत्मविश्वास तिने मनी बाळगल्याचे दिसून येत आहे.
चौकट….आदर्शवत कामगिरी पण, कौतुकापासून वंचित..!
दृष्टीहिन असताना ही सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनीने गुणवत्तेच्या जोरावर समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.मात्र,काही अपवाद वगळता डोळस समाजमनाला झापड आल्याने समीक्षा कौतुकापासून वंचित राहिली आणि यशाचा प्रकाश गेली महिनाभर दुर्लक्षित झाला आहे. शाळा,ग्रामपंचायत,सामाजिक संस्था, राजकीय नेत्यांनी या दृष्टीहीन मुलीच्या नेत्रदीपक कामगिरीचे कौतुक करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. तिच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकून प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतल्यास तिच्या प्रशासकीय अधिकारी बनण्याच्या स्वप्नाला बळ मिळणार आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.