प्रतिष्ठा न्यूज

शारीरिक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंगत्व हे अधिक धोकादायक : जगदीश काबरे ; मिरज अंधशाळेतील विद्यार्थ्याने तयार केलेले हेलन केलर यांचे ब्रेल लिपीतील चरित्र प्रकाशित

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सध्या समाजात दोन प्रकारची माणसे आढळतात, एक शारीरिक अपंगत्व असणारी आणि दुसरी मानसिक अपंगत्व असणारी. शारीरिक अपंगत्व असणारी माणसे स्वतःच्या आत्मविश्वासावर चिकाटीने मात करून ती आपलं आयुष्य सुखकर करतात. पण मानसिक अपंगत्व आलेली माणसे दुसऱ्यावर विसंबून राहून स्वतःच्या आयुष्यात अनेक संकटे ओढवून घेतात. त्यामुळे शारीरिक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंगत्व हे अधिक धोकादायक आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते जगदीश काबरे यांनी केले. ते मिरज येथील नॅब संचलित अंधशाळेतील हेलन केलर जयंती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी हेलन केलर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले ब्रेल लिपीतील हेलन केलर यांच्या चरित्राचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या अंध विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

जगदीश काबरे पुढे म्हणाले की, हेलन केलर प्रमाणे आपल्या शाळेतील अंध विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत जे यश मिळवले आहे ते कौतुकास्पद आहे. हेलन केलर या कर्णबधिर आणि अंध होत्या. पण त्यांनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर जगातील पहिली अंधव्यक्ती बॅचलर ऑफ आर्ट्स होण्याचा मान मिळविला. अमेरिकेतील विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या केलर नंतर एक जगप्रसिद्ध लेखिका, अपंगांसाठी मोठा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्या, मोठे राजकीय व्यक्तीत्व आणि क्रांतिकारी व्याख्याता म्हणून नावारूपास आल्या. त्यांनी जवळजवळ २१ जगप्रसिद्ध पुस्तके लिहिली. अमेरिकेतील समाजवादी चळवळीत त्यांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी अपंग आणि स्त्रियांच्या अधिकारांसाठी आजीवन संघर्ष केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका उज्वला हिरेगुडी यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष विनायक पटवर्धन आणि अंनिस कार्यकर्त्या आशा धनाले, त्रिशला शहा उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.