प्रतिष्ठा न्यूज

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर 52 कोटी 76 लाख व्याज परतावा – जिल्हा समन्वयक निशा पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 11 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सन 2018-19 ते 2023-24 या वर्षात 5 हजार 953 मंजूर प्रकरणात विविध बँकांमार्फत देण्यात आलेल्या 591 कोटी 76 लाख रूपये कर्जापोटी महामंडळाकडून आत्तापर्यंत 52 कोटी 76 लाख रूपये कर्जव्याज परतावा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. एप्रिल 2023 पासून आत्तापर्यंत 208 कोटी 53 लाख रूपये बँकेतर्फे कर्ज वाटप करण्यात आले आहे. महामंडळाकडून यासाठी 82 लाख 75 हजार व्याज परतावा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला आहे, अशी माहिती महामंडळाच्या जिल्हा समन्वयक निशा पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

याबाबत अधिक माहिती देताना श्रीमती पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, सन 2018-2019 या वर्षात 533 प्रकरणे, सन 2019-2020 मध्ये 717, सन 2020-2021 मध्ये 761, सन 2021-2022 मध्ये 843, सन 20222-2023 मध्ये 1 हजार 163 आणि सन 2023-2024 मध्ये 1 हजार 936 प्रकरणे विविध बँकामार्फत मंजूर करण्यात आली आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज फेब्रुवारी 2018 ते आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे सुरु आहे. महामंडळाच्या कामकाजामध्ये अतिशय पारदर्शकता आहे. लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणांच्या प्रस्तावाबाबत महामंडळामार्फत नियमित पाठपुरावा केला जातो. तसेच रजिस्ट्रेशन केलेल्या प्रत्येक लाभार्थ्याशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्यती मदत केली जाते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली जात असून व्याज परतावा लाभार्थ्यांना वेळेवर मिळत आहे त्यामुळे बँकांचाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील प्रतिनिधी बँकांना प्रत्यक्ष भेट देऊन आणि दर तीन महिन्याला प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती येथे बी.एल.बी.सी. बैठकीमध्ये महामंडळाकडील योजनांच्या कर्ज प्रकरणाबाबत काही अडचणी असल्यास लाभार्थी आणि बँका यांचे प्रश्न सोडवत आहेत. जिल्हास्तरावरील डी.एल.सी.सी. बैठकीमध्ये यावरती चर्चा करण्यात येऊन लाभार्थींना मदत करण्याबाबत बँकेंच्या प्रतिनिधींना सूचना दिल्या जातात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनेमध्ये जिल्ह्यात बँकांनी आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डी.एल.सी.सी. बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आणि जिल्हा उपनिबंधक यांचा सत्कार करण्यात आला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही अडचणी किंवा शंका असेल तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विजयनगर, सांगली येथील जिल्हा कौशल्य विभागाअंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहनही श्रीमती निशा पाटील यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.