प्रतिष्ठा न्यूज

हरहुन्नरी सुबराव आण्णा गेला अनं अख्ख गाव हळहळल

तुमचं वय ८४ झालं,आनी तुमी तरण्या पोरातनी ‘हिंडताय’ मानसं काय म्हनत्याली..? जरा म्हाताऱ्या मानसात बी बसत जावा की..  चिंगा( चिंगा मजी सुबराव आण्णाची बायकु) आशी म्हनली की सुबराव आण्णाच डोस्क फिरायचं,  आगं.. पोरातनीचं बस्तुय का बायका, बियकात बस्तुय वी मी. आसं  रागात म्हनत गावाला शिव्या दयायचा. आण्णाच वय  ८४. पन कलप करून क्यास व दाढी कायम काळी  कुळकुळीत.केसासनी वासाच त्याल, डोसक्याला गुलालाची टिकली, गळ्यात बदाम, मनगाटात काळा दोरा, चांदीच ब्रेसलेट,पांढरं शिपत बन्याल, पांढरं धोतार,पायात साद चप्पल, कंबरला खवल्याली पानाची पिशवी,आनी पान खाऊन लाल भडक झाल्याल त्वांड.पन कुट कार्यक्रम आसला की आण्णा लै कडकं आसायचा. डोसक्याला फेटा,सारी कापड पांढरी, डोळ्याला गॉगल, आनी कार्र….कार्र वाजनांर पायातलं चप्पल.लै ठिकानी लै जनांनी चप्पल हानाय डोळा ठेवला पन आण्णा बी लै कडू. चप्पल काडाय लागायचं तिथं आत जायाच्च न्हाय. आवाजाची नैसर्गिक दिनगी.फर्डा आवाज.हाळी जर दिली तर मैलबर आवाज जायाला पायजी. शेंबड्या पोरापस्न सारी तरनीबांड पोरचं आण्णाच दोस्त.भाषा म्हनला तर लय तिड्यातली. सरळ मार्गी नायतर मराठीत पी एच डी केल्याल्या मानसाच्या डोस्क्याच धय हईल..?पन तेला तेजा आर्थ कळायचा न्हाय. आसल डेंजरस बोलायचं. फूडचा मानूस कोन हाय बगून लगीच त्याच मापाच बोलायचं. ह्या वयात बी कायम नवीन शिकायची उमेद गड्याकड हुती. पाटच चार ला उटायच, आंगुळ, शान ,वैरन करून. पावणे सा वाजता आण्णा रानात. डोसक्यावन वैरनीचा भारा साडे सहा वाजता दारात पडायचा. रानात निगल्याला कडबा कवा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीन आनला न्हाय. कायम डोस्क्यान कडबा, कायम चालत कामं, खाऊन पिऊन दणदणीत. गावात गोळ्या,नळ्या खात फिरायचा.आण्णा पोरांच्यात मटन पार्ट्याला जायाचं, फिराय म्हंला तर दंडोबा डोंगराव , कोकण, गोवा, सागरेश्वर, पोरं छल म्हनली की आण्णा तयार. बोलनं मजी कंडका.. हासून , हासून मानस पालती पडायची, साऱ्यासनी ह्यो बाबा आपल्या संग फिराय आसावा आसं वाटायचं. बैलं नसली तरी चाबकाचा लै नाद.. बेंद्राला मसरांच्या आंगावं गुलाल पडायचा. घरात दारामाग चकचकीत फरशी कुराड, भाला, आनी पाचं सा येताचं दांड हायती. खाऊन तब्येत जाम,  थंडीत बी आण्णा कवा शिटर घालायचा न्हाय. म्हनून पोरं म्हनायची ह्यो लोड्याचा सलमान खान हाय.
गावात काय बी आसंल की तिथं आण्णा न्हाय आस कवा झालं न्हाय. गावातल्या गोकुळ अष्टमीला आण्णा देवळात माईक घिऊंन बसायचा. वर्गनीचं पैस देताय का न्हाय हितंन, सयपाकाच भांड कुनाच्या घरला गेलंय का? आनुन दया हितपातूर माईकवर खनखनीत बोलायचा. आज काल म्हातारी मानसं म्हनली की चिडचीड करनारी, कुजक, बोलन, ल्योक संभाळत न्हाय, सून आंन देत न्हाय आसल्या  पोतंभर तक्रारी करनारी, जुनी मानस आनी नवी पिढी हेंचं आलीकड कवा जमल न्हाय. पन आण्णा हेला आपवाद हुता. आसल्या कायच तक्रारी तेज्या कवा तोंडात न्हवत्या.या वयात बी आण्णा म्हातारा म्हनून जगलाच न्हाय.कायम तरण्या पोरांच्यागत ईचार. खाऊन, पिऊन मस्तीत जगणं.मानसानं आनंदात जिंदगी कशी जगावी ही तेंच्याकडन शिकावं वाटायचं.कायम निसर्गागत मुक्त,कधीच कुठल्या बंधनात न्हाय. आख्या जिंदगीत कवा गुळी खाल्ली न्हाय.या वयात कामाला तरण्या पोरासनी घायला आनलं यिवडी अंगात रग हुती.आजारी पडला,पडला म्हनत पंधरा दिवसात हुत्याचा न्हवता झाला.पन मरोस्तर मिशीला पीळ मारायचा गड्यान सोडला न्हाय. आण्णा मजी जुन्या इतिहासाचा चालता बोलता साक्षीदार शनिवारी गेला.
(लेखन पत्रकार विनायक कदम)
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.