प्रतिष्ठा न्यूज

गजापूर हल्ल्यातील बाधितांना आधार देऊन पुन्हा उभे करावे : पृथ्वीराज पाटील; विशाळगड प्रकरणी सरकारने लक्ष घालावे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : विशाळगडाच्या पायथ्यावरील गजापूर गावातील मुस्लिम समाजातील लोकांवर नाहक हल्ला करून त्यांच्या घरांचे नुकसान करण्यात आले. या कुटुंबांना आधार द्यावा. त्यांना पुन्हा उभे करावे, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे केली.
याबाबतच्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांच्या पायावर उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या सर्वधर्म समभावाच्या विचाराने इथली वाटचाल होत आली आहे. डोक्यावरची टोपी आणि हातातील झेंड्याचा रंग पाहून इथे माणसांत भेदाभेद कधीच होत नव्हता. गेल्या काही काळात राजकीय स्वार्थापोटी हे विष पेरण्यात आले. जाती-धर्मात भिंती उभा करण्याचे पाप केले गेले. समाजासाठी हे घातक आहेच, मात्र एकसंध राज्य म्हणून महाराष्ट्राला चिंता वाटावी, असे वातावरण तयार होताना दिसते आहे. बहुजन समाजातील आमची तरुण मुले या षङयंत्रात अडकत आहेत. बहुजन समाजासोबत गुण्यागोविंदाने नांदणारा मुस्लिम समाज त्यात भरडला जातोय.
त्याचाच परिपाक म्हणजे विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात मुस्लिम समाजाच्या वस्तीवर झालेला हल्ला. तेथे घरांची नासधूस केली गेली, काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. हा प्रकार माणुसकीला शोभणारा नव्हता. विशाळगडावरील अतिक्रमण आणि त्याबाबतच्या मागण्या हा सरकारचा विषय आहे. सरकारने त्यात लक्ष घालून योग्य ते कायदेशीर धोरण राबवावे. त्याबाबत आमची हरकत नाही, मात्र कायद्याची पायमल्ली करून वस्त्यांवर होणारे हल्ले समाजविघातक आहे. यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि पुन्हा असे हल्ले होऊ नये, याबाबत राज्य सरकारने खबरदारी घ्यावी. या कुटंबांना आधार द्यावा. त्यांना पुन्हा उभे करावे. यावेळी बिपीन कदम, सनी धोतरे, अजिज शेख, प्रशांत देशमुख, अयुब निशाणदार, समिर मुजावर, अल्ताफ पेंढारी, उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.