प्रतिष्ठा न्यूज

पुणे ते बंगळुरू महामार्गावरील टोल वसुली काँग्रेस बंद पाडणार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पुणे ते बंगळूरू रस्त्याची चाळण झाली आहे. सांगली, कोल्हापुरातून पुण्यात जायला सहा ते सात तास वेळ लागतोय. या रस्त्याचे काम लवकर व्हावे, खडे आसलेल्या ठिकाणी लगेच दुरुस्ती करावे आणि जोवर रस्ता पूर्ण होत नाही तोवर टोल आकारणी करू नये, यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता. ३) एकावेळी चार टोल नाक्यावर आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज दिली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, माजी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम,आमदार संग्राम थोपटे, आमदार विक्रम सावंत, आमदार संजय जगताप, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांच्यासह चार जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज ऑनलाईन बैठक झाली. त्यात या आंदोलनाची दिशा निश्‍चित करण्यात आली.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘या बैठकीत पुणे-बंगळुरू रस्त्याच्या स्थितीवर गंभीर चर्चा झाली. वाहन धारकांचे खूप हाल होत आहेत. रस्ता लवकर झाला पाहिजे. त्यासाठी दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. शिवाय, टोल वसुलीला विरोध करणेही गरजेचे झाले आहे. कारण, रस्त्याचे काम पूर्ण नसताना शंभर टक्के रक्कम वसुली करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे काँग्रेसचे हे आंदोलन चार टोल नाक्यांवर केले जाईल. कोल्हापूरचे लोक किणीला, सांगली व कराडचे लोक तासवडेत, साताऱ्यातील लोक आणेवाडीत तर पुण्याचे लोक खेड शिवापूर टोल नाक्यावर आंदोलनाला उतरतील. त्या दिवशी आम्ही सगळी वाहने टोल न घेता सोडणार आहोत. ती सूचना असेल, त्यानंतर आक्रमक आंदोलन उभे राहील.’’

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.