प्रतिष्ठा न्यूज

अंधश्रद्धेला हद्दपार करण्यासाठी अंनिसचे हे चित्रप्रदर्शन उपयोगी- राहुल थोरात ; अंधश्रद्धेचे बळी ठरलेल्या वनमोरे कुटुंबियांच्या स्मृतीस हे चित्रप्रदर्शन समर्पित

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : दोन वर्षांपूर्वी म्हैसाळ येथे अंधश्रद्धेतून वनमोरे कुटुंबातील ९ सदस्यांची हत्या बागवान नावाच्या मांत्रिकाने केली होती. त्यामुळे या गावांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार पोहोचणे गरजेचे होते. अंधश्रद्धा निर्मूलनाचे हे चित्र प्रदर्शन म्हैसाळ गावातून अंधश्रद्धेला हद्दपार करण्यासाठी उपयोगी होईल तसेच गावातील नव्या पिढीमध्ये (विद्यार्थ्यांमध्ये) विज्ञानवादी विचार रुजेल असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी व्यक्त केला.

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय म्हैसाळ ता. मिरज येथे आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीच्या वतीने चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुलींच्या हस्ते काळ्या बाहुल्यांचे दहन करून अभिनव पद्धतीने करण्यात आले. यातून मुलांच्या मनातील अंधश्रद्धेची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला गेला.

थोरात पुढे म्हणाले की, आपल्या गावात अंधश्रद्धेमुळे घडलेल्या अमानुष हत्याकांडाच्या या घटनेतून आपण मोठा बोध घेऊन आपल्या गावातून अंधश्रद्धेला हद्दपार करूया. यासाठी हे चित्र प्रदर्शन नक्की हातभार लावेल. अंधश्रद्धेचे बळी पडलेल्या वनमोरे कुटुंबीयांना हे चित्र प्रदर्शन अंनिस समर्पित करत आहे.

याप्रसंगी विज्ञान लेखक जगदीश काबरे म्हणाले की, मुलांच्या मनातील अंधश्रद्धा काढण्यासाठी त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवला पाहिजे. किशोरवयीन मुले चिकित्सक असतात. त्यांना प्रश्न पडतात, त्यांच्या प्रश्नांना विवेकी उत्तरे दिली तर ती विज्ञानवादी बनतील.

अंधश्रद्धा निर्मूलनावरील हे चित्र प्रदर्शन पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे, तरी म्हैसाळ पंचक्रोशीतील नागरिकांनी या चित्रप्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन मुख्याध्यापक एस.एच. पाटील यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात आशा धनाले, त्रिशला शहा यांच्या विज्ञान गीताने झाली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप जावळे, यांनी तर आभार मनोज लोकरे मांडले. तर संयोजन कलाशिक्षक कृष्णा हुलवान आणि एन.सी. सी. विभाग यांनी केले.

या कार्यक्रमास शाळा सल्लागार समिती सदस्य अजितदादा कबुरे, पर्यवेक्षक संजय लादे, प्रविण चौगुले, संजय दबडे, शशिकांत सातपुते हे उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.