प्रतिष्ठा न्यूज

जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई केशवराव धोंडगे यांच्या कार्याचा विधिमंडळात होणार गौरव

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
 उमरा : कंधार येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई केशवराव धोंडगे यांनी वयाची शंभरी पार केली आहे. यानिमित्ताने त्यांच्या संसदीय व सामाजिक कार्याचा गौरव करण्याविषयीचा प्रस्ताव विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. दि २४ ऑगस्ट 2022 रोजी या प्रस्तावावर चर्चा होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधान मंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी पत्राद्वारे दिली आहे.
भाई केशवराव धोंडगे यांनी विधानसभेत कंधार तालुक्याचे सर्वाधिक वेळा प्रतिनिधित्व केले आहे. शेतकरी, शेतमजूर, उपेक्षितांचे प्रश्न त्यांनी अतिशय पोटतिडकीने मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच सभागृहा बाहेर ४० पेक्षा अधिक मोर्चे व सत्याग्रह करून अधिकाऱ्यांना धडकी भरवली आहे. हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचा सहभाग होता.  सुरूवाती पासून खांद्यावर घेतलेला लालबावटा त्यांनी कधी सोडला नाही.
भाई केशवराव धोंडगे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा संसदीय व सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठीचा प्रस्तावावर २४ ऑगस्ट रोजी विधानसभा व विधान परिषदेत चर्चा होणार आहे. त्यात सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेते, मंत्री सहभागी होतील.भाईंच्या संसदीय व सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य शासन सरसावले आहे. त्यात सहभागी होऊन गौरव कुठे व कसा होणार आहे? याची उत्सुकता मन्याड, खोऱ्यातील नागरिकांना लागली आहे.
तीन दशके गाजवले सभागृह
 माजी खासदार व आमदार भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी साडेसहा दशकापूर्वी विधानसभेत पाऊल ठेवले होते. तिन दशके त्यांनी सभागृहात सामान्यांना न्याय मिळावा, यासाठी अनेक प्रस्ताव दाखल करून चर्चा करायला भाग पाडले. अनेक मंत्र्यांना निर्णय घेण्यास भाग पाडले. आता अडीच दशकानंतर ते सभागृहात जाणार आहेत; परंतु प्रेक्षक गॅलरीत बसून आपल्या संसदीय व सामाजिक कार्याचा गौरव करणाऱ्या प्रस्तावावरील चर्चा ऐकणार आहेत. तसेच या ठिकाणी होणाऱ्या सत्काराला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी दिली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.