प्रतिष्ठा न्यूज

ल.वि. तथा बाळासाहेब गलगले फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दिं.२८ (प्रतिनिधी) : ल.वि. तथा बाळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीने विविध सेवा पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यावर्षी वृत्तपत्र सेवा पुरस्कार दैनिक ‘सामना’चे सांगली येथील जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कांबळे यांना तर ‘सहकार सेवा’ पुरस्कार कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील आणि ‘धर्मरक्षक’ हा पुरस्कार मनोहर सारडा यांना देण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
बाळासाहेब गलगले सेवा पुरस्काराचे हे सोळावे वर्षे आहे. यावर्षी २ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते आणि सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि माजी कृषी राज्यमंत्री व नुकतेच विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्त झालेले आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा समारंभ येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी पाच वाजता होणार असल्याचे सांगून सुहास कुलकर्णी यांनी सांगितले.
बाळासाहेब गलगले यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्ताने हा सोहळा पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. यावर्षी “धर्मरक्षक” पुरस्काराचे मानकरी हे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक संस्थांमधून कार्यरत असणारे तसेच फूड्स आणि ऍग्रोटेकच्या व्यवसाय, आणि समाज, संस्कृती, संस्कार जपण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या विविध पदावर काम केलेले मनोहर सारडा यांची निवड करण्यात आली आहे. तर “विशेष सेवा कार्य” पुरस्कार साठी सतीश दुधाळ यांची निवड करण्यात आली आहे. कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेचे गेली ३० वर्ष उपक्रम राबवणारे दुधाळ हे सांगली बाजारपेठेत अतिशय कष्टाचे काम करतात. तर “वृत्तपत्र सेवा” पुरस्कारासाठी दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे .प्रकाश कांबळे १९८३ पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. २००१ सालापासून दैनिक “सामना”चे ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत ‘झेप कर्तुत्वाची’, ‘कर्मयोगी’ ,’दादा माणूस’ अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.
यावर्षीचा” क्रीडा सेवा” पुरस्कार सौ. माणिक शेखर परांजपे यांना देण्यात येणार आहे. सांगली मधील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू म्हणून त्यांच्या गौरव आहे. वयाच्या तेरा वर्षापासून ते आज अखेर त्यांनी बॅडमिंटन क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे २०२४ मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दुहेरीचे सुवर्णपदक त्यांनी मिळवले आहे. बॅडमिंटन क्षेत्रात नव्याने सहभागी होणाऱ्या तरुणांना सातत्याने त्या मार्गदर्शन करतात.
“सहकार सेवा ” पुरस्काराने यावर्षी कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांना गौरवण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ सारख्या छोट्या गावातील कुटुंबातून उद्योग आणि समाजसेवेचे स्वप्न घेऊन सांगली शहरात आलेल्या रावसाहेब पाटील यांनी उद्योग, शिक्षण, समाजसेवा ,सहकार, धार्मिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. दक्षिण भारत जनसभेचे चेअरमन, स्वदेशी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य अशा अनेक संस्थांशी ते जोडले गेले आहेत .त्यांना यापूर्वी कर्मवीर भूषण, उद्योग भूषण, जिजाऊ समाजभूषण, असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
“शाहीर सेवा” पुरस्कारासाठी यावर्षी शाहीर अनंत कुमार शिवाजी साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. शाहीर महर्षी कै. र.द. दीक्षित यांचे ते शिष्य आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे गीत व नाट्य विभागातील मान्यताप्राप्त कलाकार आहेत. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालया मार्फत राजस्थान, गुजरात ,गोवा, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले आहे. त्यांना यापूर्वी सुरभी सांस्कृतिक, स्वामी विवेकानंद,महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार आणि चित्रगुप्त पुरस्काराने सन्मानित केले आहे.
“नगरसेवा पुरस्कारा”साठी यावर्षी वीर कुदळे यांची निवड करण्यात आली आहे आष्टा शहराचे माजी नगरसेवक म्हणून वीर कुदळे यांची विशेष ओळख आहे. शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा शिवसैनिक, धडाडीचा कार्यकर्ता, शालेय गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, निराधार विधवा महिलांना शिलाई मशीन वाटप आणि मोफत स्वयंरोजगार मेळाव्याचे त्यांनी अनेक वेळा आयोजन केले आहे.
बाळासाहेब गलगले सेवा पुरस्कार वितरणाचे हे सोळावे वर्ष आहे. दरवर्षी त्यांच्या स्मृतीनिमित्त हा पुरस्कार सोहळा होत असतो.आजच्या या पत्रकार बैठकीला गलगले फाउंडेशनचे उपाध्यक्ष अरुण गडचे, सचिव कृष्णात कदम, शाहीर नामदेव आलासे , श्रीकांत शिंदे, सुभाष खराडे उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.