प्रतिष्ठा न्यूज

इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीचा आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरावर गुरुवारी आक्रोश मोर्चा

प्रतिष्ठा न्यूज
इचलकरंजी दि. २१ :“इचलकरंजी शहराचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी गेल्यावर्षी १६ ऑगस्ट २०२३ रोजी राजीव गांधी भवन येथे झालेल्या सर्वपक्षीय व्यापक मेळाव्यापासून आजअखेर पर्यंत अनेक वेळा *‘इचलकरंजीकरांना पाणी मीच देणार, सुळकूड योजनेची अंमलबजावणी मीच करणार’* अशा जाहीर घोषणा केल्या आहेत व आश्वासने दिली आहेत. प्रत्यक्षात या प्रश्नी आवाडे यांच्याकडून वा त्यांच्यामुळे कांहीही घडलेले नाही. इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीला व शहरातील सर्व नागरिकांना जाहीररीत्या दिलेल्या आश्वासनांचा आवाडे यांनी भंग केला आहे. राजकीय सोय व आगामी निवडणूक नजरेसमोर ठेवून आवाडे यांनी सोयीस्कर भूमिका घेतली आहे. आवाडे यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या वतीने *गुरुवार दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी आवाडे यांच्या निवासस्थानावर नागरिकांचा आक्रोश मोर्चा* आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते व नागरिकांनी प्रचंड संख्येने व महिलांनी मोकळ्या घागरीसह प्रचंड संख्येने सकाळी ठीक १० वाजता कॉ. के. एल. मलाबादे चौक, जनता बँकेजवळ जमावे असे जाहीर आवाहन कृति समितीच्या वतीने जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेले आहे.

प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती कार्यालयात झालेल्या या बैठकीस मदन कारंडे, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, सागर चाळके, पुंडलिक जाधव, प्रसाद कुलकर्णी, कॉ. सदा मलाबादे, विकास चौगुले, वसंत कोरवी, बजरंग लोणारी, जाविद मोमीन, शिवाजी साळुंखे, प्रमोद खुडे, प्रकाश सुतार, सुषमा साळुंखे, रिटा रॉड्रिग्युस, ज्योत्स्ना भिसे, अवधूत वाडेकर, मुकुंद माळी, युवराज शिंगाडे इ. प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

मंत्र्यांना गावबंदी कार्यक्रमाअंतर्गत इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने ११ ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्या दौऱ्यास विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि प्रशासनाची विनंती, जिल्हाधिकारी यांची मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा व तसे आयुक्तांनी दिलेले लेखी पत्र यामुळे आठ दिवसासाठी गावबंदी कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तथापि बैठक लावणेबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता जिल्हाधिकारी यांनी केली नाही. त्यानंतर दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजीच्या विविध प्रश्नांवर बैठक झाली होती. या बैठकीमध्ये अजितदादा पवार यांनी सुळकुड पाणी योजनेविषयी पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार प्रकाश आवाडे यांनी मिळून समन्वय साधावा व तोडगा काढावा असे आवाहन केले होते. तशा पद्धतीच्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या होत्या. तथापि प्रत्यक्षात हा न होणारा समन्वय कोण कसा घडविणार हे कोणीही सांगितले नाही. आवाडे मुश्रीफ यांची द्विपक्षीय परस्परविरोधी वक्तव्ये सुरूच आहेत. पण पाणी प्रश्नी दोघांचीही भूमिका राजकीय सोयीचीच आहे. त्यानंतर कृती समितीमार्फत दि. ४ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्याचे वेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. पालकमंत्र्यांनी येण्यापूर्वीच काळे झेंडे जप्त करून व आंदोलकांना अटक करून आंदोलनाला सामोरे जाणे टाळले. किमान स्थानिक आमदारांनी तरी आंदोलनाला सामोरे जाण्याचे टाळू नये, असे जाहीर आवाहन त्यांना कृती समितीतर्फे करण्यात आलेले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.