प्रतिष्ठा न्यूज

‘विरोधकांवर सौम्य भाषेत कठोर टीका कशी करायची’ हे दाभोलकरांच्या लिखाणातून समजते! – विनोद शिरसाठ; अंनिसची लेखन कौशल्य कार्यशाळा उत्साहात संपन्न!- महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यातून 250 लोक उपस्थित!

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी – नरेंद्र दाभोलकरांच्या लिखाणातून आपल्याला आपल्या विरोधकांवर सौम्य भाषेत कठोर टीका कशी करायची हे समजते. समाजात कोणी ज्या विषयांवर लिहीत नव्हते, त्यावर दाभोलकर सातत्याने लिहीत होते असे प्रतिपादन साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वतीने लेखन कौशल्य कार्यशाळा आणि शतकवीर आधारस्तंभ सोहळा रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात नुकताच संपन्न झाला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्य सांगताना विनोद शिरसाट पुढे म्हणाले की, दाभोलकरांच्या लिखाणाला ललित्याचे अंग आहे, पण केवळ मनोरंजन त्यात नाही, त्यांचे लिखाण चळवळीच्या तात्त्विक मांडणीच्या अंगाने जसे होते तसेच कार्यकर्त्याना प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन देणारे ही होते.

या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्राच्या विदर्भातील चांदयापासून कोकणातील बांदयापर्यन्तचे 250 कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ.दाभोलकर यांच्या 15 पुस्तकांचे लोकार्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

लेखन कौशल्य कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना राजीव देशपांडे यांनी सांगितले की, अंनिस वार्तापत्र म्हणजे संघटनेचा अधिकृत दस्ताऐवज आहे. हा दस्तऐवज जास्तीत जास्त अध्ययावत बनावा, त्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या लिखाण कौश्यल्यात भर पडावी, हा या कार्यशाळेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटन सत्राचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश जी. डी. पारेख आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, जिकडे तिकडे अंधभक्त सुकाळलेले आहेत. पिढीजात अंधभक्त व बनवलेले अंधभक्त असे दोन प्रकार सध्या अंधभक्तांचे आहेत पण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातून अंधभक्त कमी होणार आहेत.
सूत्रसंचलन राहुल थोरात यांनी केले.

दुसर्‍या सत्रात डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘चळवळ आणि लेखन’ यावर मार्गदर्शन केले. डॉ.दाभोलकरांच्या खुनानंतर कार्यकर्ते अतिशय निर्धाराने कार्य करत आहेत. समाजमनावर चळवळीच प्रभाव टाकायचा असेल तर त्यासाठी लिखाण हवे, कार्यकर्त्यांनी लिहावयास हवे. अभिव्यक्त होणे आवश्यक आहे. तरच चळवळीचे अस्तित्व समाजात जाणवत राहील असे प्रतिपादन करून ते म्हणाले, बुद्धीच्या पातळीवर लेखन महत्त्वाचे आहे. प्रतिगाम्यानी संत तुकाराम महाराजांना बुडवले नाही तर तुकारामांची गाथा बुडवली. आज तंत्रज्ञानाने चळवळीला अनुकूलता निर्माण केली आहे. त्या तंत्रज्ञानाचा वापर कार्यकर्त्यांनी केला पाहिजे असे सांगून ते म्हणाले, कार्यकर्त्यांना सतत लिहिते राहावे.

इंडियन एक्सप्रेस मुंबईचे पत्रकार आलोक देशपांडे यांनी बातमी लेखन यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, प्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ म्हणाले की भारतीय पत्रकारितेत कॉन्टिटीची कमी नाही तर, कॉलिटीची कमी आहे. याबरोबरच आलोक देशपांडे यांनी सिटीजन जर्नालिझमची सखोल माहिती दिली. यासाठी विविध देशातील उदाहरणे दिली. आपण ही सिटीजन जर्नालिझम कशा प्रकारे करू शकतो याबाबत सविस्तर माहिती दिली. जनतेने सत्तेला प्रश्न विचारणे म्हणजेच सिटीजन जर्नालिझम आहे. फॅक्ट चेक करणे म्हणजे सुद्धा सिटीजन जर्नालिझम आहे.

दुपारच्या सत्रात प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी ‘चला लिहूया’ या विषयावर दोन तासाची विशेष कार्यशाळा घेतली. राजीव तांबे यांनी विविध प्रात्यक्षिके देऊन आपल्यात असलेल्या सुप्त सृजनशिलतेला चालना कशी द्यायची, त्याचा लेखनात वापर कसा करावा याबद्दल बारकावे हसत खेळत अतिशय गमतीदार शैलीत सांगितले.

संध्याकाळी पाच वाजता पु. ल. देशपांडे लिखित मंगेश सातपुते दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णी निर्मित ‘मॅड सखाराम’ हे नाटक सादर झाले.

दुसर्‍या दिवशी कवयित्री नीरजा यांच्या हस्ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रासाठी वर्गणीदार, देणग्या, जाहिराती मिळविणार्‍या शतकवीर व आधारस्तंभ पुरस्कार सोहळा पार पडला. हा खरोखरच आनंदाचा अविस्मरणीय असा क्षण होता.

पुरस्कार सोहळ्या नंतर प्रमुख पाहुण्या म्हणून केलेल्या भाषणात प्रसिद्ध कवीयित्री नीरजा यांनी सध्याच्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भेदक भाष्य केले. नुकत्याच घडलेल्या स्त्री अत्याचारांची आठवण करून देत त्या म्हणाल्या, आता स्त्री सक्षमीकरण पुरे झाले. आता पुरुष सक्षमीकरणाची गरज आहे. पुरुषांची मानसिकता बदलणे, ती अधिकाधिक मानवी करणे ही काळाची गरज आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. आताच्या अंध:कारमय, अंधभक्तीच्या काळात डॉ. दाभोलकरांनी सुरू केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. भाषणाच्या अखेरीस नीरजा यांनी ‘खैरलांजी ते कोपर्डी व्हाया दिल्ली’ ही त्यांची गाजलेली कविता म्हणून दाखवली. त्यांच्या कवितेने सर्वांना अगदी सुन्न केले. कविता संपल्यावर काही क्षण सभागृहात सन्नाटा पसरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते भाऊ सावंत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्ता दाभोलकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले. राजगड जिल्हा अंनिस कार्यकर्ते यांनी संयोजन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.