प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा तालुक्यातील सर्व नागरिकांना नवउद्योजकांसाठी २२ ऑगस्ट रोजी तिसंगी येथे मार्गदर्शन कार्यक्रम

योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील सर्व नागरिकांना शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ व्हावा. या उद्देशाने शिंदे महाविद्यालय, तिसंगी येथे सोमवार, दि. २२ ऑगस्ट रोजी उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत होणार आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी/कर्मचारी त्यांच्या विभागाचे माहिती पत्रक, सर्व योजनेचे कर्ज मागणी अर्ज, ऑनलाईन योजनेसाठी संबंधित तपशील व संपूर्ण माहिती घेऊन या सर्व योजनांचा लाभ घेतलेले यशस्वी उद्योजकांसह उपस्थित राहतील. जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यासह आदी विभाग यात सहभागी होणार आहेत. तालुक्यातील अर्जदारांनी जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म तारखेचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांची मूळ प्रत व एक झेरॉक्स प्रत घेऊन उपस्थित राहावे.

विभागाचे अधिकारी त्यांच्या योजनाबद्दल माहिती सविस्तरपणे देणार असून, माहिती पत्रक व कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करून देतील. तसेच आवश्यकतेनुसार त्याच ठिकाणी कर्ज प्रस्ताव दाखल करून घेतील किंवा उर्वरित कागदपत्राबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.