प्रतिष्ठा न्यूज

सांगली येथे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृती दिन वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा

अंनिसच्या वतीने 'गाथा उत्क्रांतीची' या अ‍ॅनिमेशन फिल्म' चे सादरीकरण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : २० ऑगस्ट हा डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृती दिन राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा होतो.

वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी प्राणार्पण केलेल्या डॉ.नरेद्र दाभोलकरांना आज संपूर्ण देशात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रबोधन कार्यक्रम घेऊन भावांजली वाहिली जात आहे. या कार्यक्रमांतर्गत सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने ‘विश्वाची व जीवांची उत्क्रांती’ या विषयावरील ‘गाथा उत्क्रांतीची’ या सुंदर अॅनिमेशन फिल्मचे आयोजन यशवंतनगर हायस्कूल, सांगली येथील विद्यार्थ्यासमोर सादर करण्यात आले.

महास्फोटातून विश्व, तारे, सूर्य व पृथ्वीची निर्मिती कशी झाली येथपासून ते पृथ्वीवर जीवसृष्टीचा विकास कसा झाला याचे सुंदर ध्वनीचित्रण या फिल्मद्वारे सादर केले गेले. एक पेशी जीवापासून ते उत्क्रांत होत मानव सृष्टीत कधी आला आणि तो सृष्टीचा स्वामी कसा बनला याची माहिती विद्यार्थी अवाक् होऊन बघत होते.

यावेळी प्रा. प. रा. आर्डे म्हणाले,
“सृष्टीतील घटनांमागे दैवी कारण नसून नैसर्गिक कार्यकारणभाव आहे व तो बुद्धीने समजावून घेता येतो हा विज्ञानाचा विचार फिल्मद्वारे मुलांपर्यंत पोचविता आला.”

या फिल्मच्या संहितेच्या लेखिका प्रसिद्ध कवयित्री नीलिमा माणगावे यावेळी हजर होत्या. त्यांनी देवकल्पनेबद्दल छान कथा यावेळी सादर केली.

या कार्यक्रमाचे संयोजन सांगली अंनिसचे प्रा. प. रा. आर्डे व अमित ठकार यांनी केले. फिल्मनंतर आर्डे सरांनी उत्क्रांतीवादावर विविध प्रश्न उपस्थित करून मुलांच्या चौकसबुद्धीला प्रेरणा दिली.

या प्रसंगी अंनिसचे डॉ. संजय निटवे, आशा धनाले, त्रिशला शहा व रमेश माणगावे यांची उपस्थिती होती. यशवंतनगर हायस्कूलचे मुख्याध्यापक अरविंद कदम व त्यांचे सहकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.