प्रतिष्ठा न्यूज

तर रिक्षा चालक-मालकांना सोबत घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल पृथ्वीराज पाटील यांचा इशारा; आमदारांनी निवेदनाचे नाटक केल्याचा आरोप

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : रिक्षा परवाना विलंब शुल्क प्रति दिन ५० रुपये आकारणीच्या निर्णयाला राज्य शासनाने फक्त स्थगिती दिली आहे. पुढील आदेश बाकी आहे. तो अन्यायकारक असता कामा नये. विलंब शुल्क पूर्ण रद्दच झाला पाहिजे. सरकार गोलगोल फिरवून पुन्हा रिक्षा चालक-मालकांचा खिसा कापणार असेल तर काँग्रेस ते सहन करणार नाही. रिक्षा चालक-मालकांना सोबत घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा कॉंग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे.
पृथ्वीराज पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाने रिक्षा परवाना विलंब शुल्क प्रति दिन ५० रुपये आकारणीचा निर्णय घेतला. रिक्षा मालकांची कोंडी झाली. रिक्षा विकली तरी शुल्क भरता येणार नाही, अशी अनेकांची अवस्था होती. अशावेळी ‘सांगलीचा आवाज’ अर्थात पृथ्वीराजबाबा पाटील यांनी विषय हाती घेतला. रिक्षा चालक-मालक कोणत्या संघटनेचे आहे, त्यांचे नेतृत्व कोण करतंय, याचा कोणताही विचार न करता सांगलीकर कष्टकरी जनतेसाठी त्यांनी रस्त्यावर उतरण्याचे ठरवले. जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. सरकारला इशारा दिला. अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आज रिक्षा चालक मालक कृती समितीने बेमुदत बंद पुकारले त्यात सहभाग घेत पाठींबा जाहीर केला. या लढ्यात शेवटपर्यंत रिक्षावाल्यांसोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला. काँग्रेसचा आक्रमक चेहरा असलेल्या पृथ्वीराजबाबांच्या आंदोलनाचा आवाज मुंबईपर्यंत पोहचला. सरकारला दखल घ्यावी लागली. काही मंडळींनी कर रद्दचा निर्णय होणार याची माहिती मिळाल्यानंतर एक निवेदन तयार केले, मुख्यमंत्र्यांना दिले, सकाळी अकराला निवेदन आणि दुपारी दोनला निर्णय… वाह रे, आयत्या पिठावर रांगोळ्या… निवेदन सम्राटांचे हे ढोंग सगळ्या सांगलीला माहिती आहे. संघर्ष करा, रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, मग यश येते. त्यासाठी कष्टकऱ्यांशी नाळ जोडलेली असावी लागते. या सांगलीत कष्टकऱ्यांचा आवाज पृथ्वीराज बनलेले आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. रिक्षा चालक, मालकांनी त्यांचे आभार मानले.
आज लढाई पूर्ण जिंकलेली नाही. राज्य शासनाने फक्त स्थगिती दिली आहे. पुढील आदेश बाकी आहे. तो अन्यायकारक असता कामा नये. विलंब शुल्क पूर्ण रद्दच झाला पाहिजे. सरकार गोलगोल फिरवून पुन्हा रिक्षा चालक-मालकांचा खिसा कापणार असेल तर काँग्रेस ते सहन करणार नाही. रिक्षा चालक-मालकांना सोबत घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देखील पृथ्वीराजबाबांनी दिला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.