प्रतिष्ठा न्यूज

नांदेडमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जगतुंग तलावात बुडून मृत्यू : कंधार येथे बडी दर्गा दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : कंधार येथील प्रसिद्ध हाजी सैया सवरे मगदूम बडी दर्गा चे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या नांदेडच्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. कंधारच्या जगतुंग तलावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दि 21ऑगस्ट 2022 रोज रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढून कंधारच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, पोलीस निरीक्षक इंद्राळे यांच्यासह मयतांच्या नातेवाईकांनी धाव घेतली आहे. मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता.
नांदेड शहराच्या इक्बालनगर/ खुदबईनगर परिसरात राहणारे मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफार वय ४५ हे आपल्या कुटुंबियांसह एमएच २६ – बीडी – ४५३५ या ऑटोमधून कंधारला दर्शनासाठी गेले होते. तेथील प्रसिद्ध हाजी सैया सरवरे मगदूम बडी दर्गा चे दर्शन झाल्यानंतर सर्वजण नवरंगपुरा भागातील एका शाळेच्या आवारात त्यांनी जेवण केले. जेवल्यानंतर ताट धुण्यासाठी त्यांचा एक मुलगा जगतुंग तलावात उतरला. त्याचा पाय घसरून तो तलावात पडला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा असे एकापाठोपाठ एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. महिला नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी धाव घेतली. काही तरुणांनी तलावात उड्या मारून शोधाशोध करून अखेर पाचही मृतदेह बाहेर काढले.
नांदेडच्या एकबालनगर भागातील एकाच कुटुंबातील हे सदस्य असल्याचे लक्षात आले. मयतांमध्ये मोहम्मद विखार वय 23, सय्यद सोहेल सय्यद वाहिद वय २०, सय्यद नावेद सय्यद वाहिद वय 15, मोहम्मद साद मोहम्मद शफीउद्दीन वय15 आणि मोहम्मद शफीउदिन मोहम्मद गफार वय ४५ यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करून कंधार पोलिसांनी हे पाचही मृतदेह कंधारच्या रुग्णालयात दाखल केले आहेत. या घटनेमुळे नांदेड शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.