प्रतिष्ठा न्यूज

डॉ. भारत पाटणकर अध्यक्षतेखाली होणार दि. 10 व 11 डिसेंबर रोजी पुण्यात चौदावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन

समकालीन प्रश्नांच्या गंभीर चर्चांसह विद्रोही संमेलनात सादर होणार लघुचित्रपट, रॅप, भारुड, अभंग आणि नाटकही : शिवसन्मान प्रबोधन मिरवणुकीने संमेलनाचा प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज
पुणे प्रतिनिधी दि. 7 : सध्या अनुभवत असलेल्या फॅसिझम अर्थात एकाधिकारशाहीचा महिला, दलित,अल्पसंख्य,शिक्षण,रोजगार आदी घटक व विषयांवर विचारवंत, कलाकार कार्यकर्ते यांची होणारी गांभीर्याने चर्चा, बदलत्या नव्या पिढीची व्यक्त होण्याची साधनं म्हणून समोर येत असलेल्या लघु चित्रपट, माहितीपट या माध्यमांसह भारुड अभंग आणि नाटक याचे सादरीकरण ही यंदा पुण्यात होणाऱ्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाची वैशिष्ट्य असणार आहेत. साने गुरुजी स्मारक, दांडेकर पूल येथे दि. 10 व 11 डिसेंबर रोजी चौदावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन होत असून ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते डॉक्टर भारत पाटणकर अध्यक्षस्थानी असतील. नाटकामध्ये नवीन विचारांची पायवाट रुजवू पाहणारे नाट्यकर्मी मंजूल भारद्वाज हे संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.
विविध उपेक्षित समाज घटकांचा सहभाग, नावीन्यपूर्ण उद्घाटन, देशाच्या भाषिक, धार्मिक, सांस्कृतीक विविधता जोपासणाऱ्या आणि एकत्वाचा संदेश देणाऱ्या वास्तवाचे प्रतीक म्हणून राबणाऱ्या बहुजन समाजाचा आधार असलेली देशाच्या बहु विविधतेत एकत्वाचा टाका घातलेली ” गोधडी” हे व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून निवडण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत आणि कलाकार दोन दिवसाच्या या संमेलनात आपली हजेरी लावणार आहेत.
लुप्त होत चाललेल्या वाद्यांचे फ्युजन, छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा, संत तुकोबाराय यांचा आभंग, म. जोतीराव फुले यांच्या आखंड गायनाने संमेलनाचे उद्घाटन होईल. त्याआधी महात्मा जोतिराव फुले वाडा ते हिराबाग मार्गे शिवसन्मान मिरवणूक संमेलन स्थळापर्यंत काढण्यात येईल.
आकर्षक मांडणी सजावट केलेल्या परीसरात भारतीय फॅसिझम हा केंद्रबिंदू घेवून तीन चर्चा सत्र होतील. या चर्चेच्या अध्यक्ष डॉ. गणेश देवी, डॉ. मनीषा गुप्ते, आणि प्रा. सचिन गरुड हे असतील. महाराष्ट्रभरातून आलेले तरूण – तरुणी आठ गटात विभागून वर्तमानातील संबंधित आठ विषयावर आपले विचार मांडतील. या चर्चेचा समारोप शिक्षक आमदार कपिल पाटील करणार आहेत.
निमंत्रितांचे कवी संमेलन असून त्याचे अध्यक्षपद शाहीर शीतल साठे यांच्याकडे आहे. महाराष्ट्रातील नामवंत कवी या कवी संमेलनात आहेत. त्या मधे प्रसेनजित गायकवाड, कवी वाहरू सोनावणे, रानकवी तुकाराम धांडे असतील, सूत्र संचालन ‘दंगल’कार नितीन चंदनशिवे करणार आहेत.
या दरम्यान गोधडी नावाचे प्रत्ययकारी नाटक, लघुचित्रपट, माहितीपट, अभंग, रॅप, चळवळीतील गीते यांचे सादरीकरण होणार आहे. जागतिक पातळीवर चर्चा झालेले, पावरा या आदिवासी समाजातून आलेले गोसा पेंटर यांची चित्रे हेही संमेलनाचे विशेष आकर्षण असेल. त्याशिवाय राज्यभरातून आदिवासी समूह,भटके विमुक्तांचे प्रतिनिधी विविध शोषित घटकांचे प्रतिनिधी संमेलनात सहभागी असतील.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.