प्रतिष्ठा न्यूज

भीक मागून नव्हे, तर थोर व्यक्तींनी कष्टातून शिक्षण संस्था उभा केल्या ; पैसा शिक्षणाला द्यायचा नाही, तर काय आमदार खरेदी करायला द्यायचा का : पृथ्वीराज पाटील यांचा सवाल

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 10 : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून नव्हे, तर अत्यंत कष्टातून शिक्षण संस्था उभ्या केल्या, त्यांच्यामुळेच बहुजन समाजाचे मुले शिकू लागली, हे लक्षात घेतले पाहिजे, त्यामुळे मंत्री चंद्रकांतदादा पाटील वक्तव्य खोटारडेपणाचे आहे, तसेच या थोर व्यक्तींची बदनामी करणारे आहे, त्यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी म्हटले आहे.

श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना अत्यंत चुकीचा उल्लेख केलेला आहे. त्यावरून महाराष्ट्रभर गदारोळ उठलेला आहे. भाजपातील काही नेते तसेच राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्याची धूळ बसते न बसते, तोच भाजपच्या आणखी काही नेत्यांनी छत्रपतींच्या बाबतीत चुकीची वक्तव्ये केली आहेत. आता तर राज्य मंत्रिमंडळात करणाऱ्या चंद्रकांतदादांनीच या थोर व्यक्तींवर टीका करावी, याचे आश्चर्य वाटते.

ते म्हणाले, चंद्रकांतदादांना माहिती नसेल की, महात्मा फुले यांनी त्याकाळी कंत्राटदार म्हणून फार मोठे काम केले होते. त्यांचे या क्षेत्रात नाव होते. त्याकाळी त्यांनी सत्यशोधक समाजाच्या वतीने गरजू लोकांना बारा लाख रुपयांची मदत केली होती. टाटा आणि गोदरेज या उद्योगपतींपेक्षा त्यांची संपत्ती त्याकाळी जास्त होती. डॉ. आंबेडकर हे तर बॅरिस्टर होते, आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकांच्याकडून पै पै गोळा करून अत्यंत कष्टातून शाळा चालवल्या, ते भीक मागणे नव्हते. कर्मवीरअण्णांचे काम बघून लोकांनी शैक्षणिक कार्यासाठी स्वेच्छेने निधी दिला होता. ती एक चळवळच तयार झाली होती.

दादा म्हणतात, सरकारी निधीवर अवलंबून राहू नका, परंतु हा पैसा काही चंद्रकांतदादांच्या खिशातला नाही, तर तो सर्वसामान्य लोकांच्या खिशातून कर रूपाने जमा झाला आहे, असा पैसा शिक्षणासाठी, लोकांच्या कामांसाठी द्यायचा नाही तर कशाला द्यायचा? की तो तुम्हाला आमदार फोडण्यासाठी द्यायचा आहे, असा प्रश्न श्री. पाटील यांनी केला आहे.

ते म्हणाले चंद्रकांत दादा वाटेल ते बडबडतात आणि अंगलट आले की माफी मागतात त्यांनी बोलण्यापूर्वीच विचार करायला हवा.

या थोर नेत्यांनी शाळा काढल्या आणि त्या चांगल्या पद्धतीने चालवल्या, त्यामुळेच बहुजन समाजाची मुले शिकू लागली. स्वतःच्या पायावर उभी राहू शकली चंद्रकांतदादांना तेच बघवत नसावे, असा आरोपही श्री. पाटील यांनी केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.