प्रतिष्ठा न्यूज

न्यायिक बातमीची न्यायालय दखल घेते : न्यायाधीश ओमप्रकाश माळी; तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारदिन उत्साहात

गटविकास अधिकारी अविनाश मोहिते व बार असोसिएशच्या अतुल डांगे यांची उपस्थिती; पत्रकारांना विमा पॉलिसीचे वाटप, पुस्तक प्रकाशन सोहळा

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव (प्रतिनिधी) दि. ६ : अन्याय झालेल्या प्रत्येकाच्या प्रश्नांना वाचा फोडत त्याला न्याय मिळवून देण्याचे काम वृत्तपत्र करतात. लोकशाही मजबूत करण्याचं महत्वपूर्ण काम वृत्तपत्रांच आहे. न्यायिक बातमीची न्यायालयात दखल घेतली जाते अशी माहिती दिवाणी न्यायाधीश ओमप्रकाश माळी यांनी दिली.
तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकारदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, तासगाव बार असोसिएशनचे अतुल डांगे उपस्थित होते. तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना एक लाखाचा विमा पॉलिसीचे वाटप करून मानेवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना न्यायाधीश ओमप्रकाश माळी म्हणाले पत्रकार व न्यायव्यवस्था यांचा तसा काही संबंध येत नाही. कोर्टासमोर आलेल्या पक्षकार पुराव्यांच्या आधारे आम्ही निकाल देतो. मात्र तुम्ही समाजात मिसळता तुमच्या न्यायिक बातमीची न्यायालयालाही दखल घ्यावी लागते असे त्यांनी सांगितले. सोशल मीडिया प्रचंड वाढला आहे. यामुळे वृत्तपत्रे वाचण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी मात्र आजही वृत्तपत्र ही बातम्यांची विश्वासार्हता ठरवण्याचे प्रमाण मानले जाते. माणसाचे जीवन अधिक धकाधकीचे बनले आहे. अनेकदा पत्रकारांना विविध कामानिमित्ताने घरापासून दूर रहावे लागते. सुरक्षेच्या दृष्टीने पत्रकारांना विमा पॉलिसी गरजेची आहे. ही बाब लक्षात घेऊन तासगाव तालुका पत्रकार संघाने तालुक्यातील पत्रकारांना विमा पॉलिसीचे वाटप केले आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांनी सांगितले की तासगाव सारख्या संवेदनशील तालुक्यात प्रशासन पत्रकारांच्या सहकार्याशिवाय चालू शकत नाही. आमच्या चुका दाखवाच मात्र आमच्या विकासकामांना लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन त्यांनी केले.
बार असोसिएशनचे अतुल डांगे म्हणाले की समाजातील घडणाऱ्या घटना मांडण्याबरोबरच समाजात विधायक बदल घडविण्यासाठी पत्रकारिता महत्वाची आहे. वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सर्वानी एकत्र येऊन काम करावे. पत्रकार हा समाजासाठी झटत असतो. त्यामुळे त्याचे वैयक्तिक कौटुंबिक नुकसान होत असते. असे असताना पत्रकारांसाठी कल्याण निधी योजना गरजेची आहे.
पुस्तकांचे प्रकाशन –
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने
पत्रकार संघाचे जेष्ठ मार्गदर्शक, शिक्षण आणि परिवर्तन चे संपादक मा. राजाराम माळी यांच्या शिक्षण विषयक “प्रतिष्ठा आणि प्रश्न,” तसेच सर्वसामान्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याबाबत चे ” जनसामान्यांचा स्वातंत्र्यलढा ” या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सांगली जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी जाधव, जिल्हा सचिव कुलदीप देवकुळे, कार्यकारणीत निवड झालेले मिलिंद पोळ व तालुका अध्यक्ष संकेत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष विष्णू जमदाडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक संजय माळी यांनी करताना विविध सामाजिक उपक्रमातील संघटनेचा सहभाग असल्याचे सांगितले. विमा संरक्षण योजना गेल्या दहा वर्षांपासून सभासदांना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन विक्रांत पाटील यांनी केले . तर आभार अध्यक्ष विष्णू जमदाडे यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.