प्रतिष्ठा न्यूज

प्रभावी पत्रकारिता हे लोकशाही जिवंत ठेवण्याचे प्रभावी माध्यम होय : पोलीस निरीक्षक अरुण फुगे

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : “पत्रकार हा भारतीय लोकशाहीतील महत्त्वाचा घटक असून कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका या लोकशाहीच्या तीन स्तंभानंतर महत्त्वाची भूमिका पार पडणारा आहे. सामान्य जनतेपासून ते देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत सर्व प्रकारच्या यंत्रणाशी संपर्क करणे त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम तो सातत्यपूर्ण करत असतो. प्रभावी पत्रकारिता हा लोकशाही जिवंत ठेवण्याचे प्रभावी माध्यम आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात आता नवनवीन आव्हाने निर्माण झालेली असून ते सक्षमपणे पेलण्याचे कार्य पत्रकारांनी केले पाहिजे. पत्रकारिता हा व्यासंग असून त्याला व्यवसायापासून दूर ठेवले पाहिजे. ” असे प्रतिपादन पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय प्रसिद्धी व फोटो समिती आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र क. भा.पाटील महाविद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी पत्रकार दिन’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सुनील दिवाण, निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत,
उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब शिंदे, परीवेक्षक प्रा. युवराज आवताडे, प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय डांगे व मुक्त विद्यापीठ केंद्र संचालक डॉ. रविराज कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अरुण फुगे पुढे म्हणाले की, “समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्याची आणि विविध प्रश्नावर आवाज उठविण्याचे काम प्रसिद्धी माध्यमांना करावे लागते. प्रशासकीय यंत्रणाची मर्यादा ही प्रसिद्धी विभागासाठी कांही प्रमाणात शिथिल असते. त्यामुळे पत्रकारांची जागरूकता ही समाजाच्या हितासाठी महत्त्वाची असते. म्हणून शाळा महाविद्यालयातून पत्रकारांना होणारा सन्मान हा स्तुत्य उपक्रम आहे.”
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात ए.बी.पी. माझा न्यूज चॅनेल तथा दै. महाराष्ट्र टाईम्स चे प्रतिनिधी प्रा. सुनील दिवाण म्हणाले की, “सध्याचा काळ हा अतिशय वेगवान असून त्या काळा बरोबर पत्रकारांना धावावे लागते.
प्रिंट मिडिया हे या देशातील प्राथमिक स्वरूपाचे आणि प्रभावी असे माध्यम होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने या क्षेत्रात फार मोठी क्रांती केली आहे. प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, डिजिटल मिडिया आणि समाज माध्यमे यांच्यात जरी स्पर्धा सुरु असली तरी ही स्पर्धा देशाची लोकशाही सक्षमपणे बळकट करण्याचे काम करीत आहेत. प्रत्येक माध्यमांचे स्वरूप हे भिन्न भिन्न असले तरी त्यांच्यात कांही सशक्त आणि प्रभावी विशेष आहेत. निपक्षपाती पत्रकारिता ही काळाची गरज असून त्याचे पवित्र सर्वच पत्रकारांनी जपले पाहिजे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि उपस्थितांचे स्वागत प्रा. डॉ. दत्ता डांगे यांनी केले. या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांना यथोचित सन्मान करण्यात आला. पेन, डायरी आणि गुलाबपुष्प भेट देण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पंढरपूर शहर आणि परिसरातील सर्व पत्रकार संघटना आणि प्रसिद्धी विभागाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे-सावंत यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सिनिअर, जुनिअर व व्यवसाय कौशल्य अभ्यासक्रम विभागाकडील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन प्रमुख शिवाजी लोभे, अभिजित जाधव, संजय मुळे, समाधान बोंगे, सुरेश मोहिते, अमोल माने, सचिन वाघमोडे, हेमंत लवटे यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. रविराज कांबळे यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.