प्रतिष्ठा न्यूज

बाबासाहेबांची ‘रामू’ !बहुजनांची ‘रमाई’ !!

प्रतिष्ठा न्यूज
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ असे म्हटले जाते माता रमाई या देखील अशा प्रेरणादायी स्त्रियांपैकीच होत.. त्यातही
अलिकडच्या शतकातील इतिहास बारकाईने अभ्यासला तर जगण्यातील लवचिकता,नम्रता, त्याग आणि करुणेचे एकत्रित प्रतीक म्हणून एकमेव नाव पुढे येते आणि ते म्हणजे रमाबाई भीमराव आंबेडकर हे होय.ज्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात कुठल्याच सुखवस्तू आयुष्याची इच्छा बाळगली नाही.
अथवा ती पूर्ण नाही झाली म्हणून कधी एका शब्दानेही कुरकुर केली नाही. त्या माऊलीने आपल्या संसारातील कठीण प्रसंगातही केलेला संघर्ष,त्याग आणि बलिदानामुळेच भीमराव हे बॅरिस्टर आणि पुढे जाऊन
विश्व भूषण झाले.

बाबासाहेब रमाईला प्रेमाने ‘रामू’ म्हणून संबोधायचे आणि रमाई ही त्यांना आदराने ‘साहेब’ असे म्हणत पदोपदी त्यांचा सन्मान करायच्या. माता रमाई या सामाजिक न्यायाचे दैवत विश्वभूषण बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या खरोखरच प्रेरणास्थान होत्या.
बाबासाहेबांनी इथल्या धर्ममार्तंडांनी मानव जातीला लावलेला कलंक पुसून त्यांना माणुसकीची ओळख देण्यासाठी मनुच्या कायद्यानुसार इथे भारतात निर्माण केलेल्या विषमतावादी जाती व्यवस्थेतील अठरा पगड जाती, विविध धर्मांच्या लोकांची भाषा, रुढी, परंपरा आणि त्यांची आपापली संस्कृती जपण्याचे स्वातंत्र्य कायम राखण्याबरोबरच विविधतेमध्ये एकता प्रस्थापित करुन राष्ट्रीय ऐक्य आणि सार्वभौमत्वाला अग्रस्थान देत पिढ्यानपिढ्या निसर्गदत्त हक्क आणि अधिकार देखील नाकारले गेलेल्या इथल्या दलित, पिडीत आणि सर्व वंचित, बहुजन समाज आणि सर्व जाती-धर्माच्या महिलांना माणुसकी आणि अस्तित्वाची ओळख प्रदान करण्यासाठी नियमावलीची गरज ओळखून दिवसाची रात्र,रात्रीचा दिवस आणि रक्ताचे पाणी करुन जगातील एक अत्यंत आदर्शवत अशी ‘भारतीय राज्यघटना’ तयार केली. राज्यघटनेच्या शिल्पकाराला हे एवढं मोठं ऐतिहासिक कार्य करण्याचे बळ मिळाले याला कारण सुरुवातीच्या काळात आपल्या परिवारकडे लक्ष, वेळ आणि चरितार्थ चालविण्यासाठी पुरेसे पैसे द्यायला ही बाबासाहेबांना शक्य नव्हते अशा वेळी या माऊलीने सदैव सावली सारखी सोबत आणि पहाड बनून भक्कम पाठींबा/साथ देऊन घातलेला नैतिकतेचा भक्कम पाया होय.

बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकरांनी माणसांच्या अस्तित्वाचा,समता आणि विश्वबंधुतेचा गाडा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही पुढे ओढून आणला. परंतु पुढे काय ? त्यांच्यानंतर आज बहुजनांची चळवळ पूर्ण पणे ठप्प झालेली आहे त्याला कारण बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे पोटातील पाणी ही. न हलता
सर्व काही आयतं मिळालेल्या स्वार्थी पुरुष मंडळीसह त्यांच्या घरातील महिलाही आहेत.कारण त्यांच्या डोक्यात लहानपणापासून ऐकत आलेले रामायण आणि रामायणातील वाटमारी करुन कुटुंब पोसणा-या कुटुंब प्रमुखाची कथा घुसलेली आहे.वाटमारी केलेल्या कर्मातून फळे चाखणारे त्याचे संपूर्ण कुटुंब त्यापासूनच्या परिणामाला सामोरं जायला,त्याच्या पापात सहभागी होण्यास मात्र नकार देतात. त्याचे
कुटुंब विशेषतः त्याच्या बायकोची कथा आजच्या महिलांच्या डोक्यात. फिट बसलेली आहे. कथा, पोथी-पुराण यातून काय शिकावं,काय घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. रामायणात कांचन मृग ही कथाही आहे. ज्यात पत्नी आपल्या पतीला आपल्याला वस्त्र बनवून लेण्यासाठी हरणाच्या कातड्याची मागणी करते. हे करत असताना मुक्या जीवांचा, निष्पाप हरणांचा हकनाक जीव जाणार याचा साधा विचार देखील इच्छा करणारे आणि ती पूर्ण करायला तत्पर तयार होणारे दैवत्व लाभलेले थोर (?) व्यक्ती करत नाहीत हे देखील विशेष आहे. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढे जे काही होतं त्यालाच तर रामायण म्हटले जाते. ही कथा जशी सर्वांना माहीत आहे तशी ती रमाईला ही माहीत होती.मात्र त्या कथेतील पत्नी सारखा हट्ट रमाईने कधीच धरला नाही.उलट संसारातील कठीण प्रसंगातही रमाईंनी एका शब्दाने देखील बाबासाहेबांकडे कुरकुर केली नाही. त्या माऊलीच्या संस्कारांनी संघर्ष,त्याग आणि बलिदानामुळेच भीमराव बॅरिस्टर आणि पुढे जाऊन ‘विश्व भूषण’ झाले. बाबासाहेब त्यांना प्रेमाने रामू म्हणून संबोधायचे आणि रमाई ‘साहेब’ असे म्हणत पदोपदी त्यांचा सन्मान करायची.

माता रमाईंनी कर्तव्य भावनेतून केलेल्या या त्याग आणि बलिदानापासून इथल्या महिलांनी काहीही शिकले नाही. मात्र वाटमारी करणा-याच्या बायकोचा आदर्श. मात्र आजपर्यंत तंतोतंत पाळत आहेत. आणि बाबासाहेबांच्या चळवळीला ब्रेक लावण्याचे पातक मात्र ते नियमितपणे करत आहेत.

असामान्य कर्तृत्व असलेल्यांची योग्य दखल घेणे हे केवळ गरजेचे नसून इतरांनी त्यापासून प्रेरणा घेऊन कार्य करावे यासाठी त्यांची सार्वजनिक दखल घेणे हे समाजातील सर्वांचे कर्तव्य असते. परंतु माता रमाईच्या इतक्या महान कार्याची म्हणावी तशी दखल इथल्या लेखकांच्याकडून घेतली गेली नाही. हे हेतुपुरस्सर विषमतावादी द्वेष भावना मनी असलेल्या
लेखकांच्या दिवाळखोरीचे सत्य म्हणावे लागेल. रमाईच्या या त्यागाविषयीचे अज्ञान हे देखील आजच्या काळात, चळवळीसाठी
पुरुषांना प्रेरणा आणि पाठिंबा देण्यासाठी महिला वर्ग पुढे येत नसल्याचे एक प्रमुख कारण आहे. असो !

आज आपण जिचे गुणगान गातो तिला बाबासाहेब प्रेमाने ‘रामू’ म्हणायचे.आणि आज सर्व बहुजन रमाई नावाने त्यांचे स्मरण करतात.

अशा या ‘त्यागमूर्ती’ माता रमाईंचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्याण्णव रोजी झाला.
रमाई ही त्यांच्या आईवडिलांची सर्वात लहान मुलगी होती, ती लहान असतानाच तिची आई मरण पावली होती. तिचे वडील भिक्कू धुत्रे (वलंगकर) हे दाभोळ जवळील वानंद गावचे होते आणि दाभोळ बंदरात पोर्टर म्हणून काम करत होते ते ही वारल्यानंतर. त्या आणि त्यांचे भाऊ आणि बहिणी यांचे पालनपोषण त्यांच्या नातेवाईकांनी केले.

बाबासाहेब एल्फिन्स्टन हायस्कूलचे विद्यार्थी होते त्या वेळी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 1906 मध्ये त्यांचे वडील रामजी सुभेदार यांनी त्यांचे लग्न भिक्कू वलंगकर यांच्या कन्या रमाबाईशी ठरवले.आणि केले.

लग्नानंतर काही महिन्यांतच भीमरावांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत कोलंबिया येथील विद्यापीठात जावे लागले.त्यांच्या विदेशी जाण्याने रमाबाई समोर संकट उभे राहिले .

बाबासाहेबांची ज्ञानाची भूक न संपणारी होती.मात्र बडोद्याचे राजांनी दिलेल्या शिष्यवृत्तीची अवधी संपल्याने त्यांना एकोणीस शे सतरामध्ये आपले शिक्षण अर्धवट सोडून कोलंबिया/अमेरिकेहून मुंबईला परतावे लागले. ते निराश झाले खरे. या निराशामुळे पुन्हा कुटुंबासोबत राहण्याच्या आनंदावर विरजण पडले.
कोलंबिया/अमेरिकेहून मुंबईला परतल्यानंतर रमाबाईंना वाटले की तिचे आणि कुटुंबाचे दुःख लवकरच संपतील. तिच्या साहेबांना नोकरी मिळेल, पैसे मिळतील आणि सर्वजण आनंदाने जगू. त्यांना आशा होती की ते आनंदी, समाधानी आणि समृद्ध जीवन जगतील मुलांची आस देखील मनी होतीच.कारण पहिला मुलगा गंगाधर तोपर्यंत मरण पावला होता.

दरम्यान बडोदा नरेश नी त्यांची बुद्धीमत्ता जाणून त्यांना प्रशासनात महत्वाची नोकरी देवून त्यांची सोय केली. त्यामुळे त्यांना कुटुंबासोबत राहता आले.

सुमारे अडीच वर्षे मुंबईत रमाई सोबत राहिल्यानंतर, अर्थशास्त्रातील उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब 1920 मधे लंडनला गेले तेव्हा रमाई पुन्हा अडचणीत आल्या. जाण्यापूर्वी बाबासाहेबांनी घर खर्चासाठी म्हणून रमाईंना थोडे पैसे दिले होते.पण ते फार दिवस टिकले नाहीत म्हणून त्यांनी आपला भाऊ शंकरराव आणि बहीण मीराबाई यांच्या तुटपुंज्या कमाईतून मदत घेऊन कसे तरी घरातील सदस्यांची पोटे भरण्याचा प्रयत्न करत घर खर्च भागवला.तो काळ रमाईसाठी खूप कठीण काळ होता.

रमाबाई इथे भारतात कुटुंबासाठी दिवसातून दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी धडपडत असताना, इथून कोसो दूर लंडनमध्ये असलेल्या बाबासाहेबांची
स्थिती देखील तशी खूप चांगली नव्हती. दिवसभरात जपून ठेवलेला एखादा पावाचा तुकडा खाऊन ते झोपी जायचे ज्ञानाच्या भूकपुढे त्यांना पोटातील भुकेचे भानच नसायचे. त्यांना त्याचे काहीच वाटत नव्हते. त्याच वेळी इथे एखादा दिवस असा जायचा की,रमाईला ही रिकाम्या पोटी झोपावे लागायचे. परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेल्यावर ब-याच विचाराअंती रमाईंनी बाबासाहेबांना पत्र लिहून कुटुंबाच्या दयनीय आर्थिक स्थिती संबंधी कळविले.

बाबासाहेब लंडनहून २५ नोव्हेंबर १९२१ ला आपल्या प्रिय रामूंच्या त्या पत्राच्या उत्तरादाखल लिहीतांना
त्यांचा मोठा मुलगा गंगाधर आजारी असल्याबद्दल दुःख झाल्याचे कळवत त्यांना धीर दिला. काळजीने काहीही होणार नाही. स्वतःवर संयम आणि सगळं काही ठीक होईल यावर विश्वास ठेवण्यास सांगितले. कुठलेही सामान्य कुटुंब अशा कठीण परिस्थितीत खचून गेले असते. परंतु
ज्ञान आणि समाज हिताला श्रेष्ठ मानलेल्या या असामान्य कुटुंबाने शिक्षणाचे महत्व जाणल्यामुळे तशा परिस्थितीत ही रमाईने आपल्याला नेमून दिलेल्या अभ्यासात खंड पडू दिला नाही हे लिहीले आणि ते समजल्यावर बाबासाहेबांना आनंद झाल्याशिवाय रहावले नाही. तसेच यशवंत आणि मुकुंद यांच्या अभ्यासाची देखील त्यांनी आवर्जून विचारपूस केली.बाबासाहेब स्वतः उपासमारी अनुभवत असल्यामुळे .त्यांच्याकडेही इकडे पाठवण्यासाठी पैसे शिल्लक उरलेले नव्हते. तरि ही त्यांनी काही पैसे पाठविण्याची व्यवस्था करत असल्याचे कळवले. आणि हे ही सांगितले की,जर यास वेळ लागला किंवा गरजच भासली तर, घर चालवण्यासाठी नवीन दागिने घेण्याची हमी देत सध्या असलेले दागिने विकून टाकण्यास सांगितले. आपली तब्येत ठीक असल्याचे सांगत काळजी न करण्यास सांगितले.

बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असतानाच त्यांचा मुलगा गंगाधर वारला होता.पुढे यशवंत, रमेश, इंदू आणि राजरत्न यांचा जन्म झाला. रमाई आणि बाबासाहेब यांच्या आयुष्यात सुख,आनंद अधिक वेळ राहूच नये अशी नीयतीने ठरविले होते की काय कोण जाणे.मुलांचा हवा तसा लाड. लळा त्यांना करताच आला नाही. त्यांच्या भविष्याविषयी बांधलेले मनोरे उध्वस्त झाले.काळाने त्यांच्यावर एकापाठोपाठ एक क्रूर आघात केले नंतरची त्यांची तीन मुले आणि एक मुलगी अशी चार मुलं पुरेशा पैशा अभावी उपचार न करता आल्याने अल्प वयातच त्यांना गमवावी लागल्याचे दुःख रमाई आणि बाबासाहेबांना झाले यांचे मन इतकं दु:खी झाले की, त्यांच्या दुःखाला सीमाच राहिली नाही. सतत मानव कल्याणासाठी जीवन व्यतीत करणा-या दांपत्यांनी असे डोंगरा एवढे दु:ख ही सहन केले.याविषयी बाबासाहेब त्यांचे मित्र दत्तोबा पवार यांना लिहिलेल्या पत्रात हृदयद्रावक शब्दात त्यांची आणि रमाईंंचीवेदना सांगताना लिहीतात: “आम्ही आमच्या शेवटच्या मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून लवकर बाहेर पडू शकणार नाही. या हातांनी तीन मुलगे आणि एका मुलीला स्मशानभूमीत पोहोचवले आहे. जेव्हा जेव्हा मला मुलांची आठवण येते तेव्हा माझे हृदय भरुन येते. आम्ही त्यांच्या भविष्याबद्दल जे विचार केले होते ,मनात मनोरे रचले होते ते सगळे उध्वस्त झाले आहेत. मुलांच्या मृत्यूने आमचे जीवन मीठाशिवाय अन्नासारखे बेचव बनले आहे.जर मिठाची चवच गेली असेल तर त्या मीठाला कशाने खारवले जाईल?” या माझ्या एका विधानावरुन आमच्या आयुष्यातील पोकळीची सत्यता पटू शकेल. आमचा शेवटचा मुलगा राजरत्न आजच्या इतर सर्वांसारखा साधारण मुलगा नव्हता. अजूनही आमच्या आठवणीतून त्याचा चेहरा हटत नाही असे मूलच आम्हाला कुठे दिसत नाही. मुलांच्या या जगातून जाण्याने आमचे आयुष्य काट्याने भरलेल्या बागे सारखे झाले आहे. आम्ही इतके निराश आणि व्यथित झालो आहोत की आता यापुढे मी अधिक काहीही लिहू शकत नाही. आपल्या मित्राकडून अत्यंत दुःखात नमस्कार तेवढा स्वीकारावा ही विनंती.”

रमाई आणि बाबासाहेबांना त्यांच्या शेवटच्या मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून लवकर बाहेर पडता आले नाही. आपल्या हातांनी तीन मुलगे आणि एका मुलीचे अंत्यसंस्कार करताना रमाईचे हृदय पिळवटून गेले होते.. आई वडील म्हणून यांच्या भविष्याबद्दल जे मनोरे त्यांनी उभे केले होते ते उध्वस्त झाले.या वेदनेचे ढग त्यांच्या आयुष्यावर कायमच घिरट्या घालत राहिले. मुलांच्या मृत्यूने त्यांच्या जीवनात फार मोठी पोकळी निर्माण झाली. जेव्हा जेव्हा त्यांना त्यांची आठवण यायची तेव्हा ते मनाने अधिकच तुटायचे. बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांचा शेवटचा मुलगा अतिशय विलक्षण होता. असे मूल मला कुठे दिसले नाही. त्यांच्या या जगातून जाण्याने माझे आयुष्य काट्याने भरलेल्या बागेसारखे झाले आहे. मी इतका निराश आणि व्यथित झालो असे ते म्हणायचे.

अख्या भारताचे नीती शास्त्र,नियोजन आणि अर्थशास्त्र मांडणा-या बाबासाहेबांना आपल्या वैयक्तिक आणि आपल्या कुटुंबांच्या ढासळत चाललेल्या तत्कालीन परिस्थितीत होणा-या आर्थिक ओढाताणात अधिक भर पडून त्यांच्या जनकल्याणासाठी विशाल कार्यात व्यत्यय येऊ नये,खंड पडू नये याची काळजी घेत या मातेने आपल्या स्वतःचे आजारपण त्यांना कळू न देता आजारपणाशी झुंज दिली.

जगाच्या अर्थशास्त्राची नाडी ओळखणा-या बाबासाहेबांना हे सगळं कळतं होतं. त्यांनी मनात आणलं असतं तर आपल्या स्वतःच्या घरावर सोन्याची कौलं घालण्याची क्षमता आणि संधी होती. विशेष म्हणजे अत्यंत गरज असतानाही तत्वांना तिलांजली देण्याचे आणि केवळ आपल्या पर्यंत सिमीत सुखाचा, ऐष आरामाचा विचार करून तमाम बहुजनांशी गद्दारी करण्याचे पाप त्यांनी कधीही केले नाही.

रमाबाई आणि डॉ. आंबेडकर यांनी समाजाच्या हितासाठी भोगलेल्या त्रासाचा उल्लेखही बहिष्कृत भारतच्या संपादकीयात आढळतो . आंबेडकरांनी लिहिले की, परदेशात शिक्षण घेत असताना रमाबाईंनी त्यांच्या आयुष्यातील दीर्घकाळ घर चालवण्याची जबाबदारी घेतली. ते परत आल्यानंतरही ते समाजकार्यात इतके मग्न झाले की त्यांना दिवसातून अर्धा तास रमाबाईसाठी क्वचितच मिळत असे. त्यानंतरही रमाबाईंना कुटुंब एकट्यानेच सांभाळावे लागले. फरक एवढाच होता की तेव्हा आंबेडकर घर खर्चासाठी काही पैसे पुरवू शकत होते.

बाबासाहेब परदेशात असताना कुटुंबाचा भार रमाईंनी एकट्याने आपल्या खांद्यावर उचलला.
उच्च शिक्षण संपवून 1923 मध्ये भारतात परतल्यानंतर लौकिकार्थाने त्यांचे जीवन रथ पुन्हा रुळावर आले
ते मायदेशी परतल्यानंतर ही आर्थिक संकटाच्या काळात रमाईंनी शेणाच्या टोपल्या डोक्यावर घेऊन जाऊन गोव-या थापण्यात ही एवढ्या मोठ्या विद्वानांची पत्नी म्हणून कधी संकोच मानला नाही की, असे करण्यात त्या डगमगल्या नाहीत.मात्र हे करत असताना बाबासाहेबांच्या मोठेपणाही जपला त्यासाठी हे काम सकाळी आठ पूर्वी आणि रात्री आठ नंतर करत असत. बाबासाहेब सामाजिक-राजकीय चळवळींमध्ये इतके गुंतले की, अशा या अत्यंत प्रेमळ आणि आदरणीय पत्नीसाठी आणि कुटुंबासाठी ते दिवसातून तास भरही वेळ देऊ शकत नव्हते.

डॉ आंबेडकर 1934 मध्ये मुलगा यशवंत,पत्नी रमाबाई, भावजय लक्ष्मीबाई, पुतणे मुकुंदराव आणि आपला आवडता टॉमी या आपल्या कुटुंबासह मुंबईतील दादर उपनगरांमधील ‘राजगृह’ येथे रहायला आले.

एक मात्र खरे की, कुटुंबाची आर्थिक स्थिती काहीशी सुधारु लागली. पण बाबासाहेबांच्या जन कल्याणाच्या कार्यात कुठल्याही प्रकारचे व्यत्यय येऊ नये,खंड पडू नये याची काळजी घेत आपल्या स्वास्थाकडे सतत दुर्लक्ष करत आल्यामुळे रमाईंची प्रकृती ढासळू लागली. “रमाई आजारी असायच्या तेव्हां बाबासाहेबांनाही जवळपास दहा वर्षे तरी आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी वेळच मिळाला नाही. एकदा बाबासाहेबांना अत्यंत आवश्यक कामासाठी अचानक परदेशात जायचे होते.आजारपणामुळे लढाईला एकटीला सोडून कसे जायचे अशा विचारात असताना सोबत होण्यासाठी आणि रमाईंना हवा बदलण्यासाठी धारवाडला आपले कौटुंबिक मित्र वराळे यांच्याकडे घेऊन गेले. पण त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही.तिथे एक मात्र झाले की,रमाबाईंची ‘रमा आई’ झाली .वराळे काका लहान मुलांचे वसतिगृह चालवत होते.लहान मुलं रोज रमाई बसायची तिथं खेळायला यायची. एकदा दोन दिवस झाले मुलं खेळायला आलीच नाहीत.रमाईला चुकल्यासारखे वाटायला लागले म्हणून त्या काय कारण आहे हे विचारल्यावर
वराळे काकांनी सांगितले की, वसतिगृहाला मिळणारे मासिक अनुदान यायला उशीर होत आहे.दुकानदार धान्य द्यायला नकार देत आहे.तेव्हांअजून दोन तीन दिवस मुलांचे हालच होणार आहेत.हे ऐकून रमाईचं मन गलबलून आलं.त्या आपल्या खोलीत जाऊन रडत रडतच सोनं डबा आणि हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे काकांकडे आणून देत ते विकून अथवा गहाण ठेवून खाण्याच्या वस्तू घेऊन येण्यास सांगितले. वराळे काकांनी तसे केले. उपाशी मुलांनी पोटभर खाल्ले.त्यांच्या चेह-यावरील तृप्त झाल्याचे तेज पाहून रमाईला खूप बरे वाटले.सर्व मुलांनी त्यांना ‘रमा आई’ अशी हाक मारुन आनंद व्यक्त केला.तेव्हांपासून पुन्हा एकदा रमाबाईची ‘रमा आई’ झाली.
धारवाड च्या नंतर रमाईच्या प्रकृतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी बाबासाहेबांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले.चांगल्या नामांकित डॉक्टरांकडून औषधोपचार करूनही उपयोग होत नव्हता. जीवनाच्या सुरुवातीच्या काळात रमाईला अनेकदा उपवास करावे लागले, उपाशी राहावे लागले आणि काबाड कष्ट करावे लागले.त्यामुळे त्यांचे शरीर खंगले होते. त्यानंतर एका पाठोपाठ चार पोटच्या गोळ्यांच्या मृत्यूने तर रमाई पार मोडून गेली होती.त्यांची तब्येत सतत खालावत गेली. त्या खूपच अशक्त झाल्या होत्या मृत्यूपूर्वी पाच महिने तर त्या अंथरुणाला खिळून राहिल्या.
त्या अंथरुणाला खिळून असता बाबासाहेब घरी परतले आणि रमाईच्या जवळच बसून राहिले
रमाईची अवस्था पाहून त्यांना गलबलून आलं.रमाई उपचाराला साथ देत नव्हत्या..दहा दिवसांतच म्हणजे सत्तावीस मे एकोणीस शे पस्तीस या दिवशी भीमाला बॅरिस्टर होईपर्यंत साथ देणारी, या महामानवाची प्रेरणास्थान बनलेली रामू बॅरिस्टर असलेल्या बाबासाहेबांच्या जन कल्याणाच्या कार्यात खंड पडू नये याची सतत काळजी घेत झुरणारी
आख्या बहुजनांची आई माता रमाई त्यांच्या साक्षीने त्यांच्यासमोरच इहलोक सोडून गेली. रमाईचा जीव जणु काही त्यांच्या येण्याची प्रतीक्षाच करत थांबला होता.आकाशाएवढ्या विशाल हृदयाचे बाबासाहेब रमाईंचा श्वास थांबला तेव्हां लहान मुलासारखे ढसाढसा रडल्याचे सांगितले जाते तसेच रडत दु:खी आणि जड अंतःकरणाने अंत्ययात्रेबरोबर पायी चालत जाऊन . अंत्यसंस्कार केले.आपली रामू आपल्याला आता कधीच दिसणार नाही. यावर त्यांचा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता.घरी परतल्यानंतर त्यानी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची सुरुवातच अपमान, मानहानी, संकटांनी झाली असली तरी न डगमगलेले, परिस्थितीशी चार हात करुन मुकाबला करत पहाडासारखे भक्कम राहिलेले बाबासाहेब रमाईच्या जाण्याने माय हरवलेले एखादं लेकरु हमसून रडावे तसे आठवडाभर रडत राहिले.यातून त्यांचे आपल्या अर्धांगिनी विषयी असलेले असामान्य प्रेम तर व्यक्त होतेच.पण जगात ‘ज्ञानाचे प्रतीक ‘म्हणून ओळख असलेले, ‘भारतीय राज्यघटने’चे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांच्या जडणघडण आणि लौकिकात माता रमाईंचा किती मोठा ‘त्याग’ असेल याची प्रत्यक्ष साक्षच पहाडासारखे मजबूत असलेल्या बाबासाहेबांच्या डोळ्यातील अश्रूंनी दिलेली आहे.
अशा असामान्य गृहिणी, तमाम बहुजन आणि सर्व जात- धर्मीय महिलांना आपले अस्तित्व राखून ताठ मानेने, स्वाभिमाने जगण्याची संधी/हक्क मिळवून देण्यासाठी आपले आपल्या परिवाराचे बलिदान देणा-या महान ‘त्यागमूर्ती’ रमाईला आज एकशे पंचवीसाव्या जयंती दिनी भावपूर्ण,विनम्र आदरांजली आणि विनम्र अभिवादन !💐👏🏼

विठ्ठलराव वठारे
अध्यक्ष, जन लेखक संघ, महाराष्ट्र
joshaba1001@gmail.com

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.