प्रतिष्ठा न्यूज

कन्या महाविद्यालय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत नम्रता गुदले व पियुष काकडे यांची बाजी

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : येथील कन्या महाविद्यालयात दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ, सांगली-मिरज परिसरातील जेष्ठ उद्योजक अरविंदरावजी मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 12 फेब्रुवारी रोजी शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर तसेच कोल्हापूर विभागातील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित मकेलेल्या आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा उत्तम प्रतिसादात संपन्न झाल्या. या स्पर्धेत पदवी, पदव्युत्तर गटातून कु. नम्रता गुदले तर कनिष्ठ गटातून कु. पियुष काकडे यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. यंदा स्पर्धेचे 12वे वर्ष होते. या स्पर्धेत कनिष्ठ गटाकडे 32 तर वरिष्ठ गटाकडे 33 अशा एकूण 65 स्पर्धकांनी आपले विषय मांडले.
स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक गोखले यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी त्यांनी या वक्तृत्व स्पर्धा आणखी वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचा मानस व्यक्त केला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर होते. वरिष्ठ विभागाचे वक्तृत्व स्पर्धा विभागप्रमुख प्रा. बाबासाहेब सरगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार कनिष्ठ विभागाच्या वक्तृत्व स्पर्धा प्रमुख प्रा. मिनाक्षी देवमाने यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. रमेश कट्टीमणी यांनी केले.
दिवसभर चाललेल्या या स्पर्धेमध्ये पदवी, पदव्युत्तर गटासाठी देश बुद्धाच्या, बुद्धीच्या की युद्धाच्या दिशेने, स्पर्धा परीक्षा: धडपडणारी तरुणाई, छत्रपती शिवाजी महाराज: मॅनेजमेंट गुरू, लोकशाही ते दडपशाही व्हाया ईडी, वृक्ष लागवड: शासकीय धोरण आणि वास्तवता हे विषय तर कनिष्ठ गटासाठी व्यसन सोशल मीडियाचे, पालटले चित्र समाजाचे, वाचनाने घडतो माणूस, छत्रपती शिवाजी महाराज: एक युग प्रवर्तक, जगणे महाग होत आहे, पर्यावरणवादी चळवळीतील भारतीय तरुण हे विषय देण्यात आले होते. परीक्षणाचे काम श्री. अस्लम फकीर, प्रा. निर्मला लोंढे, श्री. राहुल पाटील, सौ. आशाराणी चौगुले यांनी केले.
या स्पर्धेत वरिष्ठ गटातून अनुक्रमे कु. नम्रता पद्मराज गुदले : कन्या महाविद्यालय, मिरज, कु. वैष्णवी शशिकांत पाटील : के. बी. पी. कॉलेज, इस्लामपूर, कु. श्रेया हिम्मतराव देशमूख : श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली, कु. विवेकानंद मारुती पाटील : भोगावती महाविद्यालय, , कुरुकली यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले. कनिष्ठ गटातून कु. पियुष पांडुरंग काकडे : मिरज महाविद्यालय, मिरज, कु. सह्याद्री गणपती कमळकर : मुरगुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मुरगुड, कु. ऋतुजा सतीश पोवार : डी. के. टी. ई., इचलकरंजी, कु. राधिका विलास चव्हाण: कन्या महाविद्यालय, मिरज यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले.
संस्थेचे सचिव श्री. राजू झाडबुके यांच्याहस्ते समारोप सत्रात विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. त्यांनी यावेळी स्पर्धकांचे अभिनंदन करीत पुढील वर्षीदेखील 12 फेब्रुवारीला स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सुनिता माळी यांनी निकालवाचन केले. कोणतेही प्रवेश शुल्क न आकारता, स्पर्धेच्या परीक्षणात व निकालात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता सांकेतिक क्रमांकावर वस्तुनिष्ठ पद्धतीने स्पर्धा घेणारे हे एकमेव महाविद्यालय असल्याच्या भावना समारोपावेळी स्पर्धकांनी व परीक्षकांनी व्यक्त केल्या. दिवसभर चाललेल्या स्पर्धेस श्री. बळवंतराव मराठे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. बी. कुंभार, श्री. दिनकरराव गोखले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणाली काळे, लिटिल आर्किड इंटरनॅशनल प्रिस्कुलच्या समन्वयक सौ. कीर्ती महाजन यांनी उपस्थिती लावली.
या स्पर्धेचे संयोजन उपप्राचार्या डॉ. सुनीता माळी, पर्यवेक्षिका प्रा. नलिनी प्रज्ञासूर्य, प्रा. बाबासाहेब सरगर, प्रा. सौ. मीनाक्षी देवमाने, सदस्य डॉ. मंजिरी कुलकर्णी, डॉ. माधुरी देशमुख, डॉ. जयकुमार चंदनशिवे, प्रा. रमेश कट्टीमणी, प्रा. पांडुरंग तपासे, प्रा. तुषार पाटील, प्रा. सौ. अनुराधा गोरे, प्रा. मीनाक्षी घोरपडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन सेवकवर्ग यांचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.