प्रतिष्ठा न्यूज

जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सांगलीत विराट मोर्चा काढणार : पृथ्वीराज पाटील

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी :  नवीन पेन्शन योजना कुचकामी आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे संसार अडचणीत आले आहेत. राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश व झारखंड शासनानी नवी पेन्शन योजना काढून जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. ते महाराष्ट्र शासन का करु शकत नाही? पक्ष, व्यक्ती व विचार बाजूला ठेवून एक होऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करु या. यासाठी आपलाच एक सहकारी म्हणून संपूर्ण सहकार्य करु व यासाठी विविध संघटनांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या सहकार्याने हजारोंच्या संख्येने सांगलीच्या कलेक्टर कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. मोर्चाचा प्रारंभ सांगली मिरज रोडवरील कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा चौकातून रविवार दि.१२ मार्च २०२३ रोजी स. १० वा. होऊन सांगली येथील जुन्या कलेक्टर ऑफिस मध्ये निवेदन देऊन मान्यवरांच्या भाषणानंतर मोर्चाचा समारोप होणार आहे असे प्रतिपादन सांगली जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील बाबा यांनी केले. जुन्या पेन्शन योजनेचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी लढ्याची आगामी दिशा निश्चित करण्यासाठी आज मिरजेत गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजित विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधींच्या बैठकीत निमंत्रक म्हणून ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, ‘सांगली मोर्चाचा आवाज व ताकद विधीमंडळाच्या अधिवेशनात पोहचला पाहिजे यासाठी विविध शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कुटुंबियासह मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे. मोर्चा आयोजनासाठी एक समन्वय समिती गठीत करुन शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘
स्वागत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले. प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले. यावेळी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी या लढ्यात शिक्षण संस्थांचे सहकार्य राहील असे सांगून एकीने लढा यश हमखास आहे असे सांगितले.
यावेळी संजय गायकवाड, चंद्रशेखर क्षीरसागर, संदीप जावळे, यशवंत जाधव, राजेंद्र नागरगोजे, अरविंद गावडे, सागर बाबर, संतोष कदम, बाजीराव प्रज्ञावंत, अरुण खरमाटे, सागर खाडे, सुनील गुरव, प्रमोद काळे, माजी आमदार भगवानराव साळुंखे व विविध संघटना पदाधिकारी यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर आणि सेवानिवृत्त कर्मचारी विविध संघटनांचे सुमारे ३०० पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
कोल्हापूरात भव्य मोर्चा काढल्याबद्दल आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर आणि सांगली मोर्चा आयोजनासाठी निमंत्रक म्हणून जबाबदारी स्वीकारल्याबद्दल पृथ्वीराज पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला. तसेच नवीन पेन्शन योजनेतील ज्या कर्मचाऱ्यांचे आकस्मिक निधन झाले आणि त्यांची कुटुंबे उघडी पडली त्यांच्या प्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. आभार प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी मानले .
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.