प्रतिष्ठा न्यूज

सावळजमध्ये गवा रेड्याचा गावात घुसण्याचा प्रयत्न, नागरिकांसह शेतकऱ्यांच्यात भितीचे वातावरण

प्रतिष्ठा न्यूज / अनिल शिंदे
 सावळज दि. 11 : सावळज : (ता. तासगाव) येथे गवा रेडा आल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. रेड्याने गावात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी हुसकावून लावले. तातडीने वनविभागाचे अधिकारी दाखल होवुन त्यांनी गवा रेड्याला भटकी परिसर मार्गे डोंगरसोनी वनपरिक्षेत्रात घालवण्याचा प्रयत्न केला आहे. गव्याच्या दहशतीखाली असलेल्या नागरिकांनी निःश्वास सोडला असला तरी वनविभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या पाठीमागील परिसरात सकाळी सहाच्या सुमारास गवा रेडा आढळून आला. त्यानंतर नागरिकांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधला. मात्र दरम्यानच्या काळात गवा रेडा गावात घुसण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र वनविभाग व नागरिकांच्या मदतीने रेड्याला हुसकावून गावात येण्यास अटकाव केला. गावपरीसरात गवारेडा आलेचे समजतात नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले. तर सावळज मध्ये प्रथमच गवारेडा आल्याने उत्सुकतेपोटी अनेकांनी गवारेडा पाहण्यासाठी धाव घेतली. गव्याचा पाठलाग करताना बघ्यांच्या गर्दीमुळे वनविभाग टीमला काहीशी अडचण येत होती. त्यामुळे गवारेडा असलेल्या परिसरात नागरिकांना जाण्यास वनविभागाच्या वतीने मज्जाव केला जात होता.
भटकी परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या बागेत गवारेडा बसुन विश्रांती घेऊन पुढे जात होता. अनेकांच्या बागेतील कामगार गवारेड्याच्या भितीने सैरावैरा पळू लागले होते. भटकी परीसर मार्गे डोंगरसोनी वनपरिक्षेत्रात घालवण्याचा प्रयत्न वनविभाग टीम करीत आहे. हा गवा रेडा आठ वर्षाचा असुन तो कवठेमहांकाळ तालुक्याच्या हद्दीतुन या परिसरात आला असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला असून वनपरिक्षेत्रात गवारेड्याला घालवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. तसेच या परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे,असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.