प्रतिष्ठा न्यूज

गौरी लंकेश प्रकरणातील मुख्य अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावरील हल्ल्यामागे ‘पीएफआय’ कि नक्षलवादी याचा शोध घ्या ! – हिंदु जनजागृती समिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कर्नाटकतील गौरी लंकेश हत्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर काल रात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. अधिवक्ता कृष्णमूर्ती हे विश्व हिंदु परिषदेची बैठक झाल्यावर त्यांच्या चारचाकी वाहनातून परत येतांना कर्नाटकातील चेट्टळ्ळी ते मडिकेरी (जिल्हा कुर्ग) प्रवास करत होते. या दरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या भ्याड हल्ल्याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. या गोळीबाराच्या मागे कोणाचा हात आहे, या अधिवक्त्यांवर आक्रमण करून कोणाचा लाभ होणार आहे, या दृष्टीने कर्नाटक पोलिसांनी तपास करून या प्रकरणातील हल्लेखोर आणि ‘मास्टरमाइंड’चा शोध घ्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी केली आहे.

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील हिंदुत्वनिष्ठ आरोपीच्या मुख्य अधिवक्त्यावर प्राणघातक आक्रमण होणे, हे अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. गौरी लंकेश यांचा नक्षलवाद्यांशी संपर्क होता, असे त्यांनी स्वतः सांगितले होते, तसेच त्यांच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांनीही निषेध व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर हा हल्ला म्हणजे या प्रकरणातील वकीलांवर एकप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्नच आहे का, अशी शंका येते. अधिवक्ता कृष्णमूर्ती हे या हल्ल्यातून बचावले असले, तरी त्यांच्यावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना सशस्त्र पोलीस संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. या भ्याड हल्ल्यामागे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) सारखी कोणती कट्टरतावादी जिहादी संघटना आहे कि गौरी लंकेश समर्थक अर्बन नक्षलवादी आहेत, याचा तपास होणे अत्यावश्यक असल्याचेही श्री. गौडा यांनी सांगितले.

अधिवक्ता कृष्णमूर्ती यांचे कोणाशी वैर नव्हते. ते हिंदुत्वाच्या क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्यामुळे याच कारणामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याची दाट शक्यता आहे. हा हल्ला हिंदुत्वावरील हल्ला आहे. ही संघटित गुन्हेगारी मोडून काढून यामागील ‘मास्टरमाइंड’चा शोध घ्यावा, अशी आम्ही मागणी करत आहोत. या संदर्भात आम्ही लवकरच कर्नाटकचे पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही वरील मागणी करणार आहोत. कर्नाटकमध्ये यापूर्वीही हिंदुत्वनिष्ठ नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले आहेत, अनेकांना ठार मारण्यात आले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍या या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आम्ही करणार आहोत. या पूर्वीही अधिवक्ता कृष्णमूर्ती यांना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या आतंकवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.