प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वारे व गारपीट सुरूच: वीज पडून दोन माणसासह अनेक जनावरे ठार, इस्लापुरात गंजीला आग, पिकांचे मोठे नुकसान

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : जिल्ह्याच्या आज सलग तिसऱ्या दिवशी विविध भागात गारपीट व अतिवृष्टी झाली. तर काही भागात वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. गुरुवार दि. 27 एप्रिल रोजी दुपारी जिल्ह्यात काही भागात पुन्हा गारपीटी आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. नांदेड शहराच्या इस्लामपुरा आणि ‘तुप्पा शिवारात वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. नांदेड शहर व जिल्ह्यात गुरुवारी तिसऱ्या दिवशीही दुपारनंतर अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मुखेड तालुक्यात गारपीट झाली. शहर व परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच काही भागात वीज पडून जीवितहानी झाली आहे. बुधवारी रात्री शहराच्या इस्लामपुरा फ्रुट मार्केट परिसरात वीज पडल्याने शेख वजीर शेख चांद (वय 42) आणि जवाहरनगर तुप्पा येथे राहणारा हिमाचल प्रदेशचा तारासिंग बाबुराम चव्हाण यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांची नोंद नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील काही भागाला अवकाळीने झोडपले.
आज गुरुवार दि.27 रोजी मुखेड तालुक्यातील दापका राजा, सावरगाव पिरजादा, लादगा, जांब परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हैराण व हवालदिल झाला आहे.
इस्लामपूर- मुरझळा येथील शेतकरी पंडित चव्हाण यांच्या शेतात वैरणाच्या गंजीवर वीज पडल्याने गंजीला आग लागून वैरण जळून खाक झाले तर त्याच्या जवळ ठेवलेले पाईप सुद्धा जळाले. यात चव्हाण यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पीडित शेतकरी पंडित चव्हाण यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मृणाल जाधव यांच्या आदेशानुसार तलाठी सुदर्शन बुरकुले, केशव थळंगे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. निसर्गाच्या या लहरीपणामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून इस्लापूरसह कोसमेट, वाळकी, कुपटी, शिवणी, आप्पारावपेठ, परोटी रोडानाईक तांडा, मलकजाम, कंचली, आंदबोरी, गोंडजेवली, कोल्हारी, मुरझळा, पांगरी या गावांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अर्धापुर तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. गारपीटीच्या तडाख्याने केळीसह पपईच्या, आंबाच्या बागा उध्वस्त झाल्या. तालुक्यातील अनेक भागात मंगळवारी, दुपारी गारांसह अवकाळी पाऊस झाला होता. पावसामुळे हळद, केळी, पपई व इतर पिकांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेक घरांची पत्रे उडाली, भिंती कोसळल्या पण सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. हवामान विभागाने गारपिटीच्या शक्यतेचा अंदाज वर्तविला होता. तालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्याने शेतीला मोठा फटका बसला असुन तालुक्यातील दाभड, मालेगाव, अर्धापूर या तीनही मंडळातील काही गावात गारपीट झाली आहे. यामध्ये दाभड, बामणी, शेलगाव, जांभरून, सावरगाव, पिंपळगाव, कलगाव, येळेगाव, पार्डी म.. निमगाव, चोरंबा, गणपूर, कामठा, उमरी, सावरगाव आदी गावांना फटका बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने वाळणीसाठी व शिजवणी सुरू असलेल्या हळद पिकाचे नुकसान झाले आहे. उभे असलेले ज्वारीचे पीक, आंबा,भाजीपाला, फुलशेती आदी पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील कोंढा, कामठा, गणपुर, पिंपळगाव, बामणी, देळूब, सावरगाव, पार्डी, हिरा आदी ठिकाणी केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी हळद वाळायला ठेवली होती. दरम्यान, अवकाळी पावसाने हजेरी लावताच हळद भीजून गेली आहे. पावसासोबत वादळवारे जोराचे होते. तालुक्यातील अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. कोंढा येथील शंकरराव कदम यांची गट नं.37 मध्ये दीड एकर तैवान पपई असून पंधरा दिवसात काढणीला आलेल्या पिकाचे अंदाजे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. भोगाव येथे अनेक घरावरील पत्रे उडून गेली, डोक्यात दगड पडल्यामुळे पंधरा वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. देळूब येथील शेतकरी नारायण सोनवणे यांच्या शेतीतील वादळी वाऱ्यासह पाऊस गारपिटीने केळी,आंबा,पपई,सौर ऊर्जेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करावी अशी मागणी शेतक-याकडून होत आहे. शंकर राजाराम गाडे यांच्या शेतातील वादळामुळे लिंबाचे झाड अंगावर पडल्याने म्हैस दगावली असून यात मोठी आर्थिक हानी झाली आहे. अर्धापूर तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीटग्रस्त भागातील शेतीचे पंचनामे करून सेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष कल्याणकर यांनी शासनाकडे केली आहे.
तसेच जिल्ह्यातील कंधार, लोहा, नायगाव, बिलोली, मुदखेड, सह सर्वच तालुक्यात चक्री वारा,व गाराचा पाऊस मोठया प्रमाणावर झाला असून कंधार तालुक्यातील पेठवडज ,बारूळ, कौठा, व लोहा तालुक्यातील उमरा, सोनखेड, माळाकोळी, कलांबर, पेनूर, आदी भागात जोराचा पाऊस झाल्याने हळद, ज्वारी, आंबा, लिंबू, कांदे, भाजीपाला, यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर हातनी येथील शेतकरी रामकीशन उबाळे यांचा बैल वीज पडून मृत्यु झाला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.