प्रतिष्ठा न्यूज

टेम्पोची मोटारसायकलला जोराची धडक : अपघातात महिलेसह तरुणाचा मृत्यू

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शहरातील कॉलेज कॉर्नर ते तासगावकडे जाणाऱ्या मार्गावरील टिव्हीएस शोरूम जवळ भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या महिलेसह तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकाश हरिश्चंद्र कांबळे ( वय ३८ रा. तक्षशिला हायस्कुल जवळ, सांगली) आणि विद्या नागराज विभूते ( वय ३५ रा. चांदणी चौक, सांगली) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. सदरचा अपघात हा बुधवार दि. १० मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी मृत प्रकाश कांबळे याचा भाऊ महादेव हरिश्चंद्र कांबळे याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पो चालक अरविंद लक्ष्मण वाघ ( वय ३७ रा. कुपवाड ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश कांबळे आणि विद्या विभुते हे दोघेजण कांबळे यांच्या मोटारसायकलवरून बुधवार दि. १० मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बायपास कॉर्नर ते कॉलेज कॉर्नरकडे जाणाऱ्या रोडवरून निघाले होते. टीव्हीएस शोरूम समोर मोटारसायकल आली असता भरधाव वेगात संशयित चालक अरविंद वाघ हा छोटा टेम्पो (क्र. एमएच १० सीआर ५२८५) घेऊन आला. त्याने कांबळे याच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तसेच विभुते या रस्त्यावर कोसळल्या. अपघातानंतर जखमी अवस्थेत दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरु असताना गुरुवार दि. ११ मे रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास प्रकाश कांबळे यांचा मृत्यू झाला तर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विद्या विभुते यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी महादेव कांबळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातग्रस्त दोनही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.