प्रतिष्ठा न्यूज

मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला; विश्‍वजीत कदम, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : अलमट्टी धरणात ८७ टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतरही अवघ्या सात हजार क्यूसेकने विसर्ग सुरू होता. ही बाब आमदार विश्‍वजीत कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या जलसंपदा विभागाशी संपर्क साधत विसर्ग वाढवण्याबाबत आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत अलमट्टीतून ७५ हजार क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरूवात झाली.
या शिष्टमंडळात आमदार विक्रम सावंत व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा समावेश होता. त्यांनी परिस्थिती समोर ठेवल्यानंतर हालचाली गतीमान झाल्या. विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे वारणा, पंचगंगा नद्यांतून पाण्याचा वेगवान प्रवाह कृष्णेत मिसळत असला तरी त्याची फूग आता जाणवणार नाही, अशी खात्री श्री. पाटील यांनी व्यक्त केली. सध्या कोयना धरणात ६२ टीएमसी इतका पाणीसाठा असून तेथून १ हजार ५० क्यूसेकने विसर्ग केला जात आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी सांगलीत आयर्विन पुलाजवळ १९ फुटांवर आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी वाढत असल्याने दुष्काळी भागासाठीच्या सिंचन योजनादेखील पूर्ण क्षमतेने सुरु कराव्यात, अशी मागणी आमदार विक्रम सावंत यांनी केली.
पावसाळ्यात कोयना व अलमट्टी धरणाच्या साठ्याबाबत दोन्ही राज्यांनी समन्वय ठेवायचा, असे ठरलेले आहे. त्यानुसार कार्यवाही होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, श्री केंगार व श्री सर्जेराव पाटील त्याकडे लक्ष वेधले. ही बाब पृथ्वीराज पाटील यांच्या कानावर घातली. त्यांनी मुंबईत आमदार विश्‍वजीत कदम यांची भेट घेतली. या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चेची वेळ ठरवली. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. कोयनेत ६२ टीएमसी तर अलमट्टीत ८७ टीएमसी पाणीसाठा असून अलमट्टीतून दोन लाख क्यूसेक विसर्ग सुरु करावा, अशी मागणी त्यांनी केली. श्री. शिंदे यांनी तातडीने परिस्थिती समजून घेत सूचना दिल्या.

हलगर्जीपणा नको : पृथ्वीराज पाटील

सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, श्री केंगार व श्री सर्जेराव पाटील आणि सहकाऱ्यांनी संपर्क साधला. अलमट्टीकडून हलगर्जीपणा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री. पाटील म्हणाले, ‘‘महापुराचे संकट हे महाराष्ट्र-कर्नाटक समन्वयातूनच टाळता येणार आहे. जल आयोगाच्या धोरणापेक्षा अधिक पाणीसाठी अलमट्टीत केला जात आहे, हे आम्ही तात्काळ लक्षात आणून दिले. त्यामुळे त्यांनी विसर्ग वाढवला आहे. पुढेही हलगर्जीपणा नको, अशी आग्रही भूमिका मांडली.’’

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.