प्रतिष्ठा न्यूज

एसटीचा कारभार सुधारा अन्यथा गय करणार नाही आ.सुमनताई पाटील यांचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन्ही आगारातील अधिकाऱ्यांच्या मनमानी आणि भोंगळ कारभारामुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे अतोनात हाल होत आहेत.गेल्या एक वर्षापासून ‘एस टी’च्या फेऱ्यांचे वेळापत्रक पूर्णपने कोलमडले आहे.चालक आणि वाहक हे मनमानी पद्धतीने फेऱ्या चालवत असल्याचे दिसून येत आहे.याचा दोन्ही तालुक्यातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
 सात दिवसात तुमचा कारभार सुधारा, नाहीतर गय करणार नाही,थेट तुमच्यावरंच कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांच्याकडे करावी लागेल, असा इशारा आमदार सुमन पाटील यांनी तासगाव आणि कवठेमहांकाळ आगार व्यवस्थापक व प्रमुख अधिकाऱ्यांना दिला.शासकीय विश्राम गृहामध्ये आयोजित बैठकीत आमदार सुमनताई पाटील यांनी ‘एस. टी.’ च्या विविध प्रश्नावर दोन्ही आगाराच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत त्यांची कानउघडणी केली.कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बस मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या तासगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शुक्रवारी तासगाव – मणेराजुरी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले.तब्बल तासभर विद्यार्थी-विद्यार्थीनी रस्त्यावर ठिय्या मारुन बसले.यामुळे आमदार सुमन पाटील यांनी यासंदर्भात अधिका-यांची एक बैठक घेतली. बैठकीत आमदार सुमन पाटील यांनी तासगाव आणि कवठेमहांकाळ आगाराच्या वरिष्ठ अधिका-यांना चांगलेच खडसावले.या दोन तालुक्यातील तब्बल पाच ते सहा हजार विद्यार्थी शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी येत असतात. परंतू त्यांना येण्या-जाण्यासाठी वेळेवरती एसटी उपलब्ध होत नाही. मुलींना तर शाळेचे नुकसान आणि घरी वेळेवर परत जात जाता येत नाही, या दोन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.विद्यार्थी-विद्यार्थिनी पासचे पैसे अगोदर भरतात,त्यांना तुम्ही फुकट सेवा देत नाही.तेंव्हा शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.बैठकीला वाहतूक नियंत्रक वैशाली भोसले,तासगावचे आगार व्यवस्थापक दयानंद पाटील, कवठेमहांकाळच्या आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत,वाहतूक निरीक्षक सुर्यकांत खरमाटे,तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विश्वास पाटील,बाजार समितीचे संचालक रवींद्र पाटील,माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे,माजी नगरसेवक अभिजित माळी,मोहन जवळेकर यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
*विद्यार्थीनींनी वाचला तक्रारींचा पाढा*
बैठकीसाठी आमदार सुमन पाटील यांनी शुक्रवारी रास्ता रोको करणा-या कांही विद्यार्थीनींना बोलवले होते. त्यांनी तक्रारीचा पाढाच वाचला. कवठेमहांकाळ आगाराच्या गाड्या तासगाव आगारातून पास घेतलेल्या  विद्यार्थी-विद्यार्थीनींना एसटी मध्ये बसून देत नाहीत.तासगावचे अधिकारी कॉलेज पासून पास देतात व कॉलेज पासून तासगावला येत असताना तिकीट आकारतात.वेळेवर गाडी न आल्याने शाळा आणि कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचता येत नाही.कॉलेज सुटलेनंतर घरी पोहचायला चार तास लागतात. घरच्यांची बोलणी खावी लागतात, त्यामुळे हाल होते.यातून आमची सुटका करा,अशी विनंती त्या विद्यार्थीनींनी आमदार सुमन पाटील यांचेकडे केली.बैठकीवेळी आमदार सुमन पाटील या अधिका-यांच्या मनमानी कारभाराची तक्रार थेट एसटी चे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांचेकडे केली.विद्यार्थ्यांच्या नुकसानीस कारणीभूत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारभार सुधारण्याच्या सूचना द्या,अन्यथा मला परिवहन मंत्र्याकडे याबाबतची तक्रार करावी लागेल असा इशारा दिला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.