प्रतिष्ठा न्यूज

अबब!! चक्क मिरजेतील महापालिकेचा रस्ताच गेला चोरीला……!!

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे 
मिरज प्रतिनिधी : येथील प्रभाग क्रमांक २ मधीलअलंकार कॉलनी मधील महानगर पालिकेने तब्बल सतरा लाख रुपये खर्चून केलेला नवीन रस्ता चोरीला गेला असल्याची तक्रार आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. गेली वीस वर्षे येथे राहणाऱ्या नागरिकांना जुन्या पिण्याची लाईन खराब झाली म्हणून महापालिकेने सहा महिनांपूर्वी नवीन पाण्याची लाईन टाकून दिली होती. मात्र अद्याप त्याला पाणीच येत नसल्याने येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक, महापालिका अधिकारी, उपायुक्त, महापौर यांना अनेक वेळा विनंत्या केल्या मात्र कोणीच याकडे लक्ष दिले नाही. शेवटी आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी यांच्या समोर यांनी आपली कैफियत मांडली.

यावेळी रस्त्याचा प्रश्न देखील त्यांनी सांगितला असता माहिती अधिकारामधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अलंकार कॉलनी, धुळेश्र्वर कॉलनी असे मिळून जवळपास सतरा लाखाची रस्त्याची कामे झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. स्थानिक रहिवाश्यांच्या मते सन २००१ नंतर इथे पुन्हा कोणत्याही रस्त्याचे काम झाले नसल्याचे सांगण्यात आले. महापालिकेचा हा अजब प्रताप बघून सगळेच चक्रावले गेले. तब्बल सतरा लाख खर्ची करून करण्यात आलेला रस्ता नेमका कोठे गेला याचे गुपित काही केल्या उघड झाले नाही. स्थानिक नागरिक व आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील नगरसेवक व महापालिका अधिकारी यांनी संगनमत करून हा रस्ता चोरला असल्याचे आरोप केला आहे. वरील विषयाच्या अनुषंगाने सोमवारी आम आदमी पार्टी ही स्थानिक रहिवाश्यांच्या सहकार्याने आयुक्तांना हा रस्ता चोरीला गेला असल्याची तक्रार देणार असल्याची माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला यांनी दिली. त्यांच्या सोबत सां. मि. कु महानगर पालिका अध्यक्ष आरिफ मुल्ला, उपाध्यक्ष संभाजी मोरे, शिवाजी गायकवाड, रवी बनसोडे व अनिस आगा, शीतल व्हनखंडे, स्वाती व्हनखंडे, कमल लोंढे, आनंदी पांढरे व मोझेस कांबळे असे सर्व रहिवासी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.