प्रतिष्ठा न्यूज

तासगाव व कवठेमहांकाळ दोन्ही तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा : सर्वपक्षीय संघर्ष समितीची तहसीलदारांकडे मागणी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगावसह कवठेमहांकाळ तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस नाही.थोड्याशा ओलीवर झालेल्या खरिपाची पेरणी धोक्यात आली आहे.शिवाय पशुधनही धोक्यात आहे.तालुक्यातील तलावांमधील पाणी साठा कमालीचा कमी झाला आहे.त्यामुळे दोन्ही तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, टंचाईमधून तलाव भरून घ्यावेत, तसेच पशुधन वाचवण्यासाठी चारा डेपो सुरू करावेत,अशी मागणी सर्वपक्षीय संघर्ष समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन तासगावचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांना देण्यात आले आहे.तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यात यावर्षी अतिशय कमी पाऊस पडला आहे.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी झालेला पाऊस खूपच कमी आहे.ऑगस्ट महिना संपत आला तरी तालुक्यात अनेक भागात दमदार पाऊस झालेला नाही.परिणामी तालुक्यातील सर्वच तलावातील पाणीसाठा खालावला आहे. सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली होती.मात्र त्यानंतर पावसाने दडी दिल्याने खरिपाची पिके कोमेजू लागली आहे.ऑगस्ट महिना तर पूर्णपणे कोरडा गेला आहे. पावसाळ्यातील सप्टेंबर हा एकच महिना शिल्लक राहिल्याने यावर्षी तालुक्यात पाणी व चारा टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीला अनेक गावांमध्ये पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चारा उपलब्ध करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत.त्यामुळे तालुक्यातील पशुधन वाचवण्यासाठी शासनाने तातडीने चारा डेपो सुरू करावेत.टंचाईमधून तालुक्यातील सर्व तलाव भरून घ्यावेत.तसेच दोन्ही तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी सर्वपक्षीय संघर्ष समितीने केली आहे.ही मागणी मान्य न झाल्यास 11 सप्टेंबर पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा या समितीने दिला आहे.तहसीलदार रांजणे यांना दिलेल्या निवेदनावर माजी सैनिक जोतीराम जाधव, शशिकांत डांगे,डॉ.विवेक गुरव, नंदकुमार पाटील,रामदास डावरे, प्रसाद वारे,जितेंद्र कांबळे,प्रमोद पाटील,अमोल कदम,मोहन भंडारे, दत्तकुमार सुर्वे यांच्या सह्या आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.