प्रतिष्ठा न्यूज

टेंभूच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक वायफळेत सोमवारपासून उपोषण, रास्ता रोको..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : टेंभू योजनेच्या पाण्यासाठी सोमवार दि. 18 पासून वायफळे (ता. तासगाव) येथे शेतकरी आमरण उपोषणास बसणार आहेत. यावेळी तासगाव – भिवघाट हायवेवर वायफळे येथे रास्ता रोकोही करण्यात येणार आहे. गेल्या 35 वर्षात माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्यासह आमदार सुमनताई पाटील,खासदार संजयकाका पाटील यांनी वायफळेसह 8 गावांना फसवल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार रवींद्र रांजणे यांना देण्यात आले आहे.
तासगाव तालुक्यातील वायफळेसह 8 गावांचा टेंभू योजनेत आजही अधिकृतरित्या समावेश नाही. त्यामुळे या गावांना हक्काचे पाणी मिळत नाही. याबाबत या गावांना आमदार सुमनताई पाटील,खासदार संजय काका पाटील यांच्याकडे अनेकवेळा पाण्याची व ही गावे या योजनेत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. मात्र गेल्या 35 वर्षात सगळ्याच लोकप्रतिनिधींकडून केवळ पाण्याचे राजकारण झाले.सद्यस्थितीत तालुक्यातील अनेक गावांना म्हैसाळ, आरफळ, विसापूर – पुणदी, ताकारी या योजनेचे पाणी मिळत आहे. मात्र तालुक्यातील वायफळे, सावळज, बिरणवाडी, यमगरवाडी, सिद्धेवादी, दहिवडी, डोंगरसोनी, जरंडी या गावांना कोणत्याही योजनेचे अधिकृतरीत्या पाणी मिळत नाही. टेंभू योजनेतून या गावांना पाणी देणे शक्य आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे आजतागायत या गावांना हक्काचे पाणी मिळाले नाही. टेंभू योजनेत या गावांचा अधिकृतपणे समावेश करा, अशी मागणी शेतकरी अनेक वर्षांपासून करत आहेत. मात्र तालुक्यातील कर्तबगार लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनाचा पाऊस पाडून शेतकऱ्यांना झुलवत आहेत.
वायफळेसह 8 गावांचा समावेश टेंभू योजनेत झाल्यास सिद्धेवाडी तलाव या योजनेच्या पाण्याने भरता येणे शक्य आहे. हा तलाव वर्षातून किमान एकदा भरल्यास अनेक गावांच्या शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. याबाबत या 8 गावातील शेतकऱ्यांनी तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील, विद्यमान आमदार सुमनताई पाटील व खासदार संजय काका पाटील यांच्याकडे अनेकवेळा ही मागणी लावून धरली आहे. मात्र आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. या गावांचा अधिकृतपणे टेंभू योजनेत समावेश नसल्याने भीक मागितल्यासारखे वारंवार पाणी मागावे लागत आहेत.त्यामुळे वरील 8 गावातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. टेंभू योजनेत या 8 गावांच्या अधिकृत समावेशासाठी तसेच हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सोमवार दि. 18 पासून वायफळे, यमगरवाडीसह 8 गावातील शेतकरी उपोषणास बसणार आहेत. तसेच वायफळे येथे रास्ता रोकोही करण्यात येणार आहे. हक्काचे पाणी मिळाल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा निर्धार आता शेतकऱ्यांनी केला आहे. पाण्यासाठी आता ‘आर या पार’ची लढाई करण्याचा चंग बांधला आहे.
याबाबतचे निवेदन तहसीलदार रवींद्र रांजणे यांना देण्यात आले आहे. निवेदनावर साहेबराव पाटील, वायफळेचे लोकनियुक्त सरपंच संतोष नलवडे, शिवाजी विकास सोसायटीचे चेअरमन विनोद पाटील, आर. जे. पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, राजेश पाटील, संपत पाटील, अर्जुन यमगर, कैलास यमगर यांची नावे आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.