प्रतिष्ठा न्यूज

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कामारीचे तरुण सुदर्शन देवराये यांनी केली आत्महत्या

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीचा आजही जोर असून नांदेड जिल्ह्यात भीषण स्वरूप धारण केल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील काही मराठा बांधव मागच्या दोन दिवसापासून हिमायतनगर येथे साखळी उपोषणास बसले होते. यातील एका मराठा आंदोलनकर्त्या युवकाने रात्री 12 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आमरण उपोषणापासून जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यभरात उपोषणं सुरू आहेत. जरांगे पाटील यांनी तूर्त आमरण उपोषण सोडलं असलं तरीही ठिकठिकाणी आमरण किंवा साखळी उपोषणं सुरू आहेत.अशातच नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे काही मराठा बांधव मागच्या दोन दिवसापासून उपोषणास बसले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यात राज्य शासनाने चालढकल करीत असल्याची  भावना कामारी येथील युवक सुदर्शन ज्ञानेश्वर देवराय कामारीकर यांची निर्माण झाली. या प्रकाराला कंटाळून दि.17 सप्टेंबर 2023 रोज रविवारी रात्री 12 वाजता त्यांनी स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवल्याची गंभीर घटना घडली आहे.
ही घटना समजताच हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता त्या ठिकाणी एक सुसाईड नोट (चिठ्ठी) सापडली. सदर चिठ्ठीमध्ये त्याने “मी सुदर्शन ज्ञानेश्वर देवराय, कामारी. शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे” असे स्पष्टपणे लिहलेली चिट्ठी आढळून आली आहे. सदरील मराठा युवकाचा मृतदेह हिमायतनगर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
या धक्कादायक घटनेनंतर कामारी व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी व सकल मराठा समाजाने पालकमंत्री यांनी प्रत्यक्ष येऊन भेट दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती नातेवाईक व सकल मराठा समाजाच्या समन्वयक- सुचिता पाटील जोगदंड यांनी केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.