प्रतिष्ठा न्यूज

द्राक्षबागांवर अच्छादन हाच पर्याय शेतकरी नेते संदीप गिड्डे – पाटील : शासनाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ द्यावा..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव :गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, विशेषत: द्राक्षबागायतदार शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.दरवर्षी काही ना काही संकट शेतकऱ्यांवर कोसळत आहे,मात्र प्रत्येकवेळी नुकसानभरपाई हा उपाय नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आता द्राक्षबागेवर प्लॅस्टीकच्या कागदाचे आच्छादन करावे निसर्गाच्या अस्मानी संकटांमधून वाचण्याचा हाच एकमेव मार्ग आहे शासनानेही जास्तीत – जास्त शेतकऱ्यांना आच्छादनासाठी अनुदानाचा लाभ द्यावा,असे मत शेतकरी नेते संदीप गिड्डे – पाटील यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले,अलिकडच्या काही वर्षात निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे. दुष्काळ, गारपीट,अवकाळी,वादळ अशी अनेक संकटे बळीराजावर कोसळत आहेत.या संकटांशी दोन हात करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सततच्या संकटांच्या मालिकेमुळे बळीराजा उद्ध्वस्त होत आहे.त्यातच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्याही वाढत आहेत.दरवर्षी शेतकऱ्यांचे कोणत्या ना कोणत्या कारणाने नुकसान होत आहे.नुकसान झाले की पंचनामे आणि नुकसानभरपाईचा मुद्दा प्रत्येकवेळी चर्चेत येतो.मात्र अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाई मिळते. मिळणाऱ्या नुकसानभरपाईतून मजुरांचा खर्चही निघत नाही.त्यामुळे द्राक्षबागायतदारांची शेती तोट्यात चालली आहे.यापुढील काळात निसर्गातील बदल अधिक गतीने होण्याचे संकेत आहेत.निसर्गातील हा बदल शेतकऱ्यांसाठी घातक आहे. बदलता निसर्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे.त्यामुळे बदलत्या निसर्गाला गृहीत धरून शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे नियोजन करावे लागणार आहे.शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरली पाहिजे.द्राक्षबागायतदारांना तर आता आभाळाखालची उघड्यावरची शेती करणे अधिक धोकादायक आहे.
परिणामी शेतकऱ्यांनी आता द्राक्षबागेवर अच्छादन करून द्राक्षशेती करणे काळाची गरज आहे.दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हाच एकमेव उपाय आहे.शासनानेही याबाबत जनजागृती करुन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत माहिती देणे गरजेचे आहे.याशिवाय द्राक्षबागेवरील अच्छादनासाठी सरकारने शेतकऱ्यांना भरीव अनुदान देण्याची गरज आहे. शासनाने जास्तीत – जास्त शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देऊन अच्छादनासाठी प्रयत्नशिल राहणे गरजेचे आहे,असेही मत गिड्डे – पाटील यांनी व्यक्त केले.
*सरकारने नुकसानभरपाईही द्यावी : संदीप गिड्डे – पाटील*
अवकाळीच्या तडाख्याने राज्यभरात शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र तुटपुंज्या भरपाईने शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी. दरवेळी नुकसानभरपाई हा उपाय नसला तरी सरकारने अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपरणे उभे राहणे गरजेचे आहे, असे मत संदीप गिड्डे – पाटील यांनी व्यक्त केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.