प्रतिष्ठा न्यूज

बेदाणा तारणच्या नावाखाली सावकारकी जोमात…वर्षाला तब्बल 24% व्याजदर?

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव तालुका द्राक्षे आणि बेदाणा उत्पादनासाठी राज्यासह देशात प्रसिध्द आहे.तालुक्यात दरवर्षी कोट्यावधी  रुपयांची द्राक्षांची आणि बेदाण्याची उलाढाल होते.त्यात तालुक्यासह जत विजापूर,पंढरपूर,सोलापूर,जमखंडी, सांगली अशा विविध ठिकाणाहून बेदाणा तासगावच्या मार्केटमध्ये येतो.
तासगावच्या बेदाणा मार्केटचें आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान आहे, मात्र बेदाण्याचा उत्पादक लाभापासून नेहमीच वंचित राहिला आहे.वर्षानुवर्षे अनेक संकटावर मात करून कर्जबाजारी राहून द्राक्ष पिकवून त्याचा बेदाणा करणारा शेतकरी कायमच कर्जात राहिला असून व्यापारी मात्र ‘बेदाणा तारण’ या नावाखाली सावकारी करून  मालामाल झाल्याचे दिसत आहेत.
पंधरा वर्षांपूर्वी तासगाव तालुक्यामध्ये केवळ २५ शीतगृहे होती,आज ५५ हून अधिक आहेत.अडत दुकानाचे १४० परवाने आहेत,तर बेदाणा खरेदीदार परवानाधारक ८१ आहेत.
शेतकऱ्याने बेदाणा शीतगृहांमध्ये ठेवल्यानंतर त्याच्याकडून भाडेपट्टा वसुली करायचीच,पण याचवेळी त्याला द्राक्षबागेच्या औषधांसाठी, खर्चासाठी बेदाणा तारण कर्ज देऊन वर्षाला तब्बल २४ टक्के व्याजदराने पैसे द्यायचे,असा मोठा लुटीचा फंडा सुरू आहे.शेतकऱ्यांना लुटणारी ही व्यवस्था दरवर्षी यातून कोट्यावधीचा काळा पैसा कमावत आहे.मात्र,केवळ तक्रारी अभावी आजपर्यंत एकही कारवाई झालेली नाही.यापैकी एकाही व्यापाऱ्याकडे कागदावर या पैशाची कसलीही नोंद नसल्याचे सांगण्यात येते.शेतीशी निगडीत व्यवसाय म्हणून शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटून दुसरीकडे शेतकऱ्यांची लुटमार करण्याचा प्रकार उघडपणे सुरू असतो.मात्र,गरज असलेला शेतकरी अडचणीमुळे मुकाटपणे हा त्रास सहन करत आहे.
एकीकडे प्रत्येक द्राक्ष हंगामामध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन अनेक व्यापारी पसार होतात तर दुसरीकडे व्यापारी मात्र उघडपणे बेदाणा तारणच्या नावाने आपली घरे भरत आहेत.यावर शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे पुढारी वा मार्केट कमिटीचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.