प्रतिष्ठा न्यूज

मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे; लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सहभागी यंत्रणांचा आढावा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.28 : लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगली लोकसभा मतदार संघातील पुर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी काय काय नियोजन केले जात आहे, याचा आढावा सर्व संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यांच्याकडून जिल्हा नियोजन समिती सभागृहत घेतला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, संबंधित ARO नी मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी यावे यासाठी तरुण, वयोवृद्ध व दिव्यांग तसेच महिला मतदार यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सोयीसुविधा चांगल्या द्याव्यात तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांमधे दिव्यांगांसाठी रॅम्प, महिला पुरुष स्वच्छता सुविधा, लाईट, पाणी, निवारा-सावलीची व्यवस्था तसेच मॉडेल मतदान केंद्र याबाबत आवश्यक सूचना केल्या. लोकशाहीमध्ये मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रियेवर भर दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावेत, असे सांगून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार संघामध्ये दिव्यांग, महिला, एकमेवद्वित्तीय अशी आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी.
तसेच जिल्ह्यातील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्राला पोलीस विभागासोबत भेटीचे आयोजन करुन आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांना मतदार नोंदणीप्रसंगी प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात. महिला मतदारांची नोंदणी करुन मतदान जनजागृतीपर मेळावे आयोजित करण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशा सूचना दिल्या.
मतदार यादीच्या माहितीचे (डाटा) दर आठवड्याला अवलोकन करावे. मतदार नोंदणीच्या अनुषंगाने प्राप्त सर्व अर्ज विहीत मुदतीत निकाली काढावे तसेच प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संबंधीतानी त्याचे निराकरण करावे. मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यातील त्रुटींची पूर्तता करावी. त्याचबरोबर या निवडणुकीत 100 टक्के मतदान करणाऱ्या गावांचा जिल्हा प्रशासनातर्फे यथोचित सन्मान करावा अशी सूचनाही श्री. देशपांडे यांनी केली.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी लोकसभा निवडणुकीकरिता सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती पीपीटीद्वारे सादर केली तसेच जिल्ह्यात एकूण 2421 मतदान केंद्रे असल्याचे सांगितले. या पूर्वतयारी आढावा बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न करावेत – श्रीकांत देशपांडे
राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर बी.एल.ए. (बुथ लेव्हल एजंट) नियुक्त करणे आवश्यक आहे. मतदार नोंदणी व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी आपआपल्यापरीने, कसोशीने प्रयत्न करावेत, असे आवाहन अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी श्री. देशपांडे यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कामकाजाबाबत आढावा घेतल्याचे सांगून सर्व यंत्रणा त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले कामकाज व्यवस्थितपणे पार पाडत असल्याचे ते म्हणाले. निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांचाही सहभागी घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत निवडणूकीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडीअडचणीबाबत त्यांनी यावेळी संबंधितांशी चर्चा केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.