प्रतिष्ठा न्यूज

तासगावात जागतिक महिला दिनानिमित्त तमाशातील उपेक्षित महिला कलावंताचा सन्मान…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नगरपरिषदेच्या साने गुरुजी नाट्यगृहात महाराष्ट्रामध्ये उमा बाबाजी तमाशा कलावंत संघटना, नवयान जलसा,नरवीर उमाजी नाईक संघटना आणि पुरोगामी संघटनेच्या सहयोगाने विविध तमाशा फडात काम करुन तमाशा ही लोककला जिवंत राहण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या महिला कलावंतांचा विशेष सन्मान सोहळा पार पडला.या सोहळ्यासाठी  आमदार श्रीमती सुमन ताई पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.बाबुराव गुरव, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जिल्हा सचिव कॉम्रेड मारुती शिरतोडे,जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे माजी सभापती छायाताई खरमाटे,सुप्रसिद्ध लावणी सम्राट आशा लाखे,उपस्थित होते.यावेळी तमाशात काम करणाऱ्या 40 पेक्षा अधिक महिला लोककलावंत भगिनींचा आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.याप्रसंगी बोलताना आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या की तमाशा ही लोककला जपण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या तमाशातील सर्वच कलाकार हे जीवापाड मेहनत घेऊनही उपेक्षित जीवन जगत असतात त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार आहे.ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.बाबुराव गुरव म्हणाले की तमाशा कलावंतांनी आपली पुढील पिढी लहान मुले यांना चांगले दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच तमाशा लोककलावंतांना मानधन नको तर पेन्शन मिळाली पाहिजे या मागणीचा लढा भविष्यात उभा करण्यात यावा असे आवाहन केले.छायाताई खरमाटे यांनी  तमाशातील काम करणाऱ्या महिलांचे प्रश्न याबाबत लोक जागृती करण्यासाठी चळवळींनी अधिक लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली. शरद शेळके यांनी आपले हक्क लढून मिळवावेत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे तमाशा कलावंतांना आवाहन केले तर अर्जुन थोरात यांनी सर्वसामान्य घरी कुटुंबातील कलाकार आणि अत्यंत उच्चभ्रू जीवन जगणारे कलाकार याची तुलना करता तमाशा क्षेत्रातील गरीब कलाकारांचे जगण्याचे सर्व प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी रस्त्यावरची लढाई करण्याचे आवाहन केले.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शहाजी पाटील,राष्ट्रसेवा दलाच्या नूतन परीट , अर्चना पवार,बारा बलुतेदार संघटनेचे भगवान लोंढे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक उमा बाबा पेडकर तमाशा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष भास्कर सदाकळे यांनी केले तर आभार भगवान लोंढे यांनी मानले.या सन्मान सोहळ्यास लता लंका पाचेगावकर,माया तासगावकर पॅरन  कराडकर,कांचनताई पाटणकर अशा ज्येष्ठ महिला कलाकार,बालम पाचेगावकर,राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लघुपटातील माया पवार सह ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव ,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे,तासगाव मधील अंनिसचे अमर खोत,पत्रकार चंद्रकांत गायकवाड ,रामोशी संघटनेचे बाबुराव जाधव ,जादूगार गौरव ,नंदू कोळी, यांचे सह कार्यकर्ते कलाकार उपस्थित होते. सर्व महिला कलावंतांना चोळीचा खण टॉवेल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन तर ज्येष्ठ महिला कलावंत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर पुरस्कार प्राप्त हिराबाई कांबळे यांचा आमदार सुमन ताई पाटील यांच्या हस्ते साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.या  सत्कार सोहळ्याने अनेक महिला कलावंतांच्या भावना अनावर झाल्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.