प्रतिष्ठा न्यूज

निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना करा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 26 : महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वयाद्वारे निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि निवडणुका मुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठीचे नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित पुणे विभागाच्या निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदिप घुगे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल आदी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, आदर्श आचारसंहिता आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य समन्वयासाठी देखील योग्य नियोजन करावे. पैशाचा आणि बळाचा वापर होऊ नये आणि नागरिकांना निर्भयपणे मतदान करता येईल यादृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहीत करावे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यासोबत मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्याविषयी व्यापक जनजागृती करावी. उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता सकाळी आणि सायंकाळी दोन तास मतदानासाठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन आवश्यक ती व्यवस्था करण्यात यावी. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील समस्या जाणून घ्याव्यात, असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सांगली जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. या आढावा बैठकीसाठी पुणे सोलापूर सांगली सातारा जिल्ह्यातील निवडणुक संबंधित सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षकांसह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.