प्रतिष्ठा न्यूज

मांजर्डेतील कुंभार कुटुंबाने विधवा प्रथा मुक्तीची केली सुरुवात : खा.संजय काकांच्या हस्ते सत्कार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : परंपरेच्या जोखडातून स्त्रिया आजही मुक्त झालेल्या नाहीत. पुरोगामी महाराष्ट्रात स्त्री सुधारणा चळवळीचा पाया छत्रपति शिवाजी महाराज,महात्मा फुले,महर्षी कर्वे यांच्या महाराष्ट्रात आजही पतीच्या निधनानंतर स्त्रियांवर क्रूरपणे होणारा अन्याय तिचे मंगळसूत्र तोडणे,हिरवा चुडा फोडणे,तिची सौभाग्य अलंकार अक्षरशः ओरबाडून काढणे,त्यानंतर समाजात तिची अवहेलना करणे,  कोणत्याही शुभकार्यात स्थान न देणे,  करंट्या कपाळाची म्हणणे पतीच्या निधनाने आधीच खचलेल्या स्त्रीला अधिकच खचवण्याचं काम ही प्रथा करते.पती निधनात जिचा काहीच दोष नसताना आकारण वाईट प्रथेमुळे तिला वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागते.या अनिष्ट प्रथेविरुद्ध महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश जारी केला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मांजर्डे येथील कुंभार कुटुंबीयांनी केली. कै.के. टी. कुंभार (सर) यांच्या आकस्मिक निधनानंतर सर्व कुटुंबीयांनी या प्रथेला छेद देण्याचे काम केले.यावेळी कुटुंबातील प्रमुख व्यक्तींनी सर्व जुन्या नव्या पिढीला एकत्र विश्वासात घेऊन प्रथम कुटुंब स्तरावर सुरुवातीला निर्णय घेतला. पती निधनानंतर आपल्या मातोश्रींच्या अंगावरील दागिने काढले जाणार नाहीत.घरातील पुरोगामी व आधुनिक विचारांच्या मुलांचा आग्रह,सर्व नातेवाईकांचा आग्रह यामुळे सरांच्या पत्नी यांनीही जुन्या पिढीतील विचारांचा पगडा असतानाही नवीन सर्जनशील विचार स्वीकारला त्यास तिने मान्यता दिली.
या मोठ्या निर्णयाला समाज मान्यता मिळावी यासाठी मांजर्डे ग्रामपंचायत सरपंच सौ.संध्याराणी मंडले, उपसरपंच मोहननाना पाटील,युवानेते सचिन दादा पाटील व भावकीतील सर्व लोक यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून हा निर्णय रक्षा विसर्जनाच्या वेळी सर्व ग्रामस्थांपुढे समाजापुढे नेण्याचे ठरविले.हा निर्णय गावातील प्रमुख मंडळींनी समाजासमोर सांगितला त्यावेळी सर्व लोकांनी हात वर करून त्याला समाज मान्यता दिली.यावेळी नेते अविनाशकाका पाटील,युवराजदादा पाटील व पंचक्रोशीतील सर्व मान्यवर लोक उपस्थित होते.यावेळी सरांच्या रक्षा ह्या तीर्थक्षेत्री वा ओढ्यात विसर्जित न करता त्यांनी स्वतः वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना व शेतात घालण्यात आली.
 काही सज्जन तीर्थासी जाती l अस्थिर राख भरोनी नेतीl
मनी गंगोदके नाहीशी होती l पापे त्याची ll
अशी लोकांमध्ये असलेली भ्रांती की गंगाजळामध्ये अस्थी विसर्जित केल्यानंतर जीव मुक्त होतो,या प्रथेलाही फाटा देत कुंभार कुटुंबीयांनी डोळस निर्णय घेतला.जिवंत असता रोटी ना दे l मेलीयावरी वाजवी वाद्ये l कावळ्यासि पिंड,इतरां दक्षिणा दे l म्हणून साधी काय त्याने ? असा प्रश्न मनात विचारून कुंभार कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय मांजर्डे गावच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल.रक्षा विसर्जन झाल्यावर घरी आल्यानंतर 76  वय वर्षे असलेल्या सौ. सुमन कृष्णा कुंभार (मातोश्री) मोठ्या मनाने जुन्या विचारांचा पगडा बाजुला सारत नवीन पिढीच्या उद्याच्या सुंदर दिवसांसाठी,सावित्रीच्या लेकींसाठी स्वीकारला.यावेळी घरात जमलेल्या सर्व पै पाहुण्यांमध्ये,भावकीतील  सर्व उपस्थितांमध्ये 25 ते 30 वर्षांपूर्वी वैधव्य आलेल्या दोन मुलींनाही त्यांच्या पतीच्या नावाने त्यांच्या शुभलग्नातील सौभाग्य अलंकार सौ सुमन काकी,  सरपंच संध्याराणी मंडले यांच्या हस्ते देण्यात आले.सौ.सुमन कृष्णा कुंभार यांना माननीय खासदार संजयकाका पाटील ,सरपंच,उपसरपंच इतर मान्यवर ,पाहुणे,नातेवाईक यांच्या उपस्थितीत त्यांचं सौभाग्य लेणं त्यांच्याकडे सुपूर्त केलं व आम्रवृक्ष भेट देऊन त्यांना या वृक्षाप्रमाणेच आपले पुढील जीवन आनंदाने सुखाने बहरावे अशा सदिच्छा त्यांनी दिल्या. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले होते…..!
यावेळी मा. खासदार संजय काकांनी कुंभार कुटुंबीयांनी व सुमन काकींनी या अनिष्ट प्रथेविरुद्ध कृतिशील निर्णय घेतल्याबद्दल ग्रामस्थांचे व कुटुंबीयांचे कौतुक केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.