प्रतिष्ठा न्यूज

संजयकाकांसाठी मनसे सैनिक मैदानात : सांगलीतील पक्ष मेळाव्यात पूर्ण पाठिंब्याची नेत्यांची ग्वाही

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.२२: महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद, राजसाहेब ठाकरे जिंदाबाद अशा दणकेबाज घोषणा देत सोमवारी येथे मनसेच्या जिल्हा शाखेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांच्यासह मनसेच्या सांगली जिल्ह्यातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार माननीय खासदार संजयकाका पाटील यांना प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करण्याची ग्वाही दिली. मनसेचा जिल्हा मेळावा अतिशय उत्साहात पार पडला. मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संयोजकांनी व्यवस्था केलेल्या खुर्च्यासुद्धा कमी पडल्या. अनेक कार्यकर्त्यांना जमेल तेथे बसून किंवा उभे राहूनच भाषणे ऐकावी लागली. जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाने सर्व पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याचे संयोजन केले होते. अविनाश अभ्यंकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राजसाहेब यांचा शब्द म्हणजे मनसे सैनिकांना आदेश असतो.त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व मनसे सैनिक संजयकाका पाटील यांच्यासाठी जोरदारपणे काम करतील आणि त्यांना प्रचंड मताधिक्य देतील. संजयकाकांचा विजय निश्चितच आहे ;पण प्रश्न मताधिक्याचा आहे आणि ते देण्यासाठी मनसे सैनिक आटोकाट प्रयत्न करतील. अभ्यंकर म्हणाले, राजसाहेब ठाकरे चांगल्याला चांगले आणि चुकीला चूक म्हणणारे आहेत. त्यांना एखादी गोष्ट पटली की ते त्या विषयात कधीही माघार घेत नाहीत. जम्मू आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवणे, सीएए लागू करणे, आयोध्येत राममंदिराची उभारणी अशा सर्व निर्णयांचे आणि उपक्रमांचे राजसाहेबांनी स्वागत केले आहे. कौतुक केले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांचा बिनशर्त पाठिंब्याचा आदेश हा प्रत्येक जिल्ह्यातील मनसे सैनिक निष्ठेने पाळतील यात कोणीही शंका बाळगू नये. भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर इनामदार म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघात राजसाहेब यांची सभा व्हावी अशी महायुतीतील सर्व कार्यकर्ते आणि जनतेचीही इच्छा आहे. त्या दृष्टीने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. केवळ लोकसभा निवडणूक झाली म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि मनसे यांच्या मैत्रीचा विषय संपणार नाही. यापुढे महापालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकातही हातात हात घालून काम करू आणि जिल्ह्यातील उरली सुरली काँग्रेसही हद्दपार करून टाकू. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकरतात्या पाटील यांची भाषणे झाली. व्यासपीठावर मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, विलासराव देसाई आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.