प्रतिष्ठा न्यूज

मिरज कन्या महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सप्ताह

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मिरजेतील दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीच्या कन्या महाविद्यालयामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व उपक्रम दि. ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये व्याख्याने, महाविद्यालय परिसर स्वच्छता, शहरातून रॅली, पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, नाणी प्रदर्शन, ध्वजारोहण इत्यादिंचा समावेश आहे. हे सर्व कार्यक्रम अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना, मराठी विभाग, इतिहास विभाग यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले आहेत.
या सप्ताहाची सुरुवात इतिहास विभागप्रमुख डॉ. मंजिरी कुलकर्णी यांच्या ‘क्रांतिकारकांचे कार्य’ या विषयावरील व्याख्यानाने झाली. त्यांनी आपल्या व्याख्यानातून भारतास स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचा लढा डोळ्यासमोर उभा केला. मंगल पांडे, तात्या टोपे यांचा १८५७ चा उठाव, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे बलिदान, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांचे योगदान, महात्मा गांधी यांचा मिठाचा सत्याग्रह, स्वदेशी चळवळ, असहकार चळवळ, छोडो भारत आंदोलन असे विविध मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राचे योगदान नेहमीच अग्रेसर राहिले असल्याचे सांगत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब पत्रावळे, वसंतदादा पाटील, इंदुमती पाटणकर, होसाताई पाटील यांच्या अतुलनीय कार्याचा आलेख मांडला.
या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. सागर पाटील व विभागातील सदस्यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ. माधुरी देशमुख यांनी केले. डॉ. गंगाधर चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा.कु. सोनम कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. सागर पाटील यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.