प्रतिष्ठा न्यूज

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 12 : यंदा हवामान विभागाने 100 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी आपत्कालीन परिस्थितीत दक्ष रहावे. तसेच त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्सून तयारी आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अर्पणा मोरे, लिना खरात, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील नाले व गटार सफाई तात्काळ करून त्यामधील गाळाची योग्य विल्हेवाट लावावी. नागरिकांना दुषित पाणी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी फॉगींग करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यांची माहिती एस.टी. व उपप्रादेशिक परिवहन विभागाला त्वरीत द्यावी. त्याचबरोबर महसूल प्रशासन, पोलीस, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्राची पाहणी संयुक्तरित्या करावी. आपत्ती निवारण कामामध्ये एन.डी.आर.एफ.च्या जवानांसह पोलीस तसेच सेवाभावी संस्थांचा सहभाग घ्यावा. पूरपरिस्थितीत वॉटर रिसोर्सेसची तपासणी करत असताना त्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण योग्य राहील याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी. तात्पुरत्या निवारा केंद्रासाठी जिल्ह्यातील मोठ्या मंगल कार्यालयांची यादी तयार करण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिले. तर शहरातील धोकादायक इमारतीवर महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर कार्यवाही केल्याची माहिती मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी दिली.
प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी जिल्ह्यातील 13 मंडळामध्ये 65 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला असल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात कोठेही जिवीत हानी झाली नसल्याचे सांगितले. या बैठकीसाठी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.