प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रीय पातळीवर जादुटोणा विरोधी कायदा लागू करावा! – हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : काल उत्तर प्रदेश मधील हाथरस मध्ये शिवबाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबाच्या सत्संगाचा वेळी झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये शंभर पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले असून अनेक लोक अजून उपचार घेत आहेत. ह्या घटने मधील मृत व्यक्तींना अंनिस मार्फत आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात अंनिस सहभागी आहे.

पूर्व आयुष्यात पोलीस कर्मचारी असलेल्या आणि पुढे जावून स्वतः ला बाबा नारायण हरी म्हणवून घेणाऱ्या बाबाच्या विरोधात देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वतीने करण्यात आली आहे.

अशा स्वरूपाच्या घटनाच्या नंतर प्रत्यक्षात त्याला जबाबदार बाबा बुवा आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी हे नामानिराळे राहतात आणि काही प्याद्यांचा बळी दिला जातो हे लक्षात घेता सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी व्हावी अशी देखील मागणी या पत्रकात करण्यात आली आहे.

हा स्वयंघोषित बाबा स्वतः देवाचा अवतार असल्याचे जाहीररित्या सांगत असतो. त्यामधूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने भक्त गोळा केले आहेत. महाराष्ट्रात अंनिसच्या प्रयत्नातून झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्या द्वारे लोकांना फसवणे हा गुन्हा आहे. असाच कायदा देशभर लागू केला तर भोलेबाबाच्या सारख्या बाबांना आळा बसू शकेल असे देखील अंनिसने पत्रकात नमूद केले आहे.

सर्व पक्षीय राजकीय नेते मतांच्या साठी अशा बाबा बुवांना पाठीशी घालतात ते थांबणे आवश्यक आहे असे अंनिसचे मत आहे.

आज राज्यसभेत खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या धर्तीवर जादूटोणाविरोधी कायदा देशभर लागू करण्याची मागणी केली आहे. माननीय सभापती धनकड यांनी देखील जादूटोणाविरोधी कायद्याच्या विषयी दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून सदनाच्या पुढे मांडवी असे सांगितले आहे. ती स्वागतार्ह गोष्ट आहे असे देखील या पत्रकात अंनिसने नमूद केले आहे.

जादूटोणाविरोधी कायद्याच्या महाराष्ट्रातील गेल्या दहा वर्षांच्या अंमलबजावणी मध्ये सर्वधर्मीय बाबा बुवांच्या विरोधात गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा झाल्याने हा कायदा सर्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मूलन करणारा असल्याचे सिद्ध झाले असल्याचे देखील पत्रकात नमूद केले आहे. ह्या कायद्याच्या गैर वापराची एक देखील घटना समोर आलेली नाही हे देखील महत्वाचे असल्याचे अंनिस मार्फत सांगण्यात आले आहे.

या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांना जादूटोणा विरोधी कायद्याची प्रत देवून अशा स्वरूपाचा कायदा संसदेत मांडण्याची विनंती करणार आहे. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी या अभियानात तयार झालेल्या पंचवीस पुस्तिका हिंदी मध्ये अनुवादित करून हिंदी भाषिक लोकांना उपलब्ध करणार आहे.

हज यात्रा, अमरनाथ यात्रा अशा अनेक धार्मिक ठिकाणी दर वर्षी मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू होतात. लोकांनी देखील आपल्या श्रध्दा बाळगताना आपल्या आयुष्य आणि आरोग्य याची काळजी घेवून या पाळायला हव्यात असे आवाहन अंनिस वतीने मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, अण्णा कडलास्कर, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, फारुख गवंडी सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे, प्रकाश घादगिने, प्रशांत पोतदार, मुक्ता दाभोलकर, विनोद वायंगणकर, अशोक कदम, प्रविण देशमुख यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.