प्रतिष्ठा न्यूज

उमेदच्या कंत्राटी कामगारांचा मुंबईत मोर्चा; सांगलीतील महिला निघाल्या मुंबईला कंत्राटी कामगारांना कायम करण्यासह विविध मागण्या

प्रतिष्ठा न्यूज
सांगली/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत काम करणाऱ्या महिला, कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी (दि. १०) पासून मुंबईत मैदानावर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी उमेदअंतर्गत काम करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील महिला कर्मचारी गुरुवारी रात्री मुंबईकडे रवाना झाल्या. मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून तीन दिवस झाले तरी कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने या महिला आझाद मैदानावर निघाले असल्याची माहिती संघटनेच्या मिरज तालुका सचिव शशिकला गावडे यांनी दिली.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागातील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्यावी, या अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष पदांवर सेवेत कायम समाविष्ट करावे.प्रभागसंघ स्तरावरील केडर कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक,मत्स्य व्यवस्थापक व प्रभागसंघ व्यवस्थापक यांची इतर उमेद अभियानातील केडरप्रमाणे मानधनवाढ करावी, वर्धिनीनाही पूर्णवेळ काम द्यावे व समुदायस्तरीय संस्थांना सक्षम होण्यासाठी पुरेसा निधी द्यावा. मोटिंगचा प्रवास व उपस्थिती भत्ता द्यावा. अशा विविध मागण्या संघटने करून करण्यात आल्या होत्या. व त्या प्रलंबित होत्या.
उमेदअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने सोमवारी मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी बैठक घेऊन त्यामध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन देत मोर्चा रद्द करण्याची विनंती केली होती. त्यानुसार संघटनेने हा मोर्चा रद्द केला; परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी यासंदर्भात कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे संघटनेने बुधवार पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. तीन दिवस भर पावसात या कंत्राटी कामगार महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. एका बाजूला लाडकी बहीण योजना सारख्या महिलांसाठी योजना राबवल्या जात आहेत, मात्र महिलांसाठी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना नियमित करून घेतले जात नाही,त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, आपल्या मागण्यांसाठी त्यांनाच आंदोलन करावे लागते. हे वाईट आहे असे सांगत सांगली जिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचारी गुरुवार (दिनांक ११ रोजी) रात्री मुंबईकडे रवाना झाल्या.
प्रमुख पदाधिकारी वैशाली पाटील, अधिका बाबर, नंदिता खटावे, गायत्री कांबळे, शोभा निकम, सारिका चव्हाण, सुमेधा शिंदे या प्रमुख प्रतिनिधीसह महिला मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.