प्रतिष्ठा न्यूज

नांदेड मध्ये- सकल मराठा समाजाच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद- दुकाने, शाळा, कॉलेज स्वयंस्फूर्तीने बंद, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील बांधव मनोज जरांगे पाटील व त्यांचे सहकारी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ दि. 4 सप्टेंबर रोज सोमवारी पुकारण्यात आलेल्या नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहरातील श्रीनगर व शिवाजीनगर भागात आंदोलन कर्त्यांनी दगड मारून दुकानाच्या व गाडीच्या काचा फोडल्या.या घटना वगळता बंद शांततेत पार पडला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
तालुका किनवट येथे आंदोलनकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत पैनगंगेत आंदोलन केले. अर्धापूरमध्ये गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. शहरातील राज कॉर्नरपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत सकल मराठा समाजाच्यावतीने सकाळी 11 वाजता पदयात्रा काढण्यात आली. सदरील पदयात्रा राज कॉर्नर, श्रीनगर, महात्मा फुले चौक, शिवाजीनगर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर आंदोलन कर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राज्य सरकारचा तीव्रशब्दात निषेध केला. व जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी मुख्यमंत्री- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे आजच्या बंदमध्ये राजकीय नेते- पदाधिकाऱ्यांना पुढाकार घेऊ देण्यात आला नाही. आंदोलनात विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी तसेच मराठा बांधव, विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
या जिल्हा बंदमध्ये बालक, महिला, तरुणी, तरुण, ज्येष्ठ नागरिक व सर्व स्तरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून सहभाग घेतला तसेच शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेसने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सकल मराठा समाजाच्या या बंदला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. तसेच जिल्ह्यातील अनेक गावांत या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
या घटनेचा नांदेड जिल्हा बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलीस अधीक्षक- मा. श्रीकृष्ण कोकाटे यांनी घेऊन स्वतः व अतिरिक्त पोलीस अधीक्षक- मा.अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी- शहर- मा.सुरज गुरव, इतवाराचे उपविभागीय पोलीस अधिकारी- मा. सुशीलकुमार नायक, भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक- सूर्यमोहन बोलमवाड, शिवाजीनगर ठाण्याचे- मोहन भोसले, वजिराबादचे- अशोक घोरबांड, विमानतळ ठाण्याचे- नागनाथ आयलाने, इतवारा ठाण्याचे- संतोष तांबे, नांदेड ग्रामीणचे- जगदीश भंडरवार, शहर वाहतूक शाखेचे- संजय ननवरे, गुप्त वार्ताचे- कवितके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक- द्वारकादास चिखलीकर, एपीआय- रवी वाव्हळे, पांडुरंग माने यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी क्युआरटी पथक, आरसीपी बंदोबस्तात सहभागी झाले होते. पोलिसांनी बुलेटप्रूफ जॅकेट परिधान करून मोर्चामध्ये सहभाग नोंदविला होता.एकंदरीत हा मोर्चा शांततेत पार पडला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.