प्रतिष्ठा न्यूज

स्वतंत्र विचार करणारा कलाकार सत्ताधाऱ्यांना घातक असतो : डॉ. हमीद दाभोलकर ; अंनिस चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर अंनिस संघटनेने संविधानाच्या चौकटीत राहून विरोध केला. आपला विरोध संविधानिक मार्गाने व्यक्त करताना कला मदतीला येतात, डॉ. दाभोलकर यांचा विचार संपवणाऱ्यांना आजचे हे चित्रप्रदर्शन उत्तर आहे असे प्रतिपादन अंनिसचे राज्य कमिटीचे सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. ते काल शांतिनिकेतन कला विश्व महाविद्यालय सांगलीमध्ये पार पडलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

डॉ. हमीद दाभोलकर पुढे म्हणाले की, धर्मसत्तेने सुरुवातीच्या काळात आपले वर्चस्व प्रस्थापित करताना कलेचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला. तरीही कलेची भीती ही सत्ताधाऱ्यांना नेहमीच असते. स्वतंत्र विचार करणारा कलाकार नेहमीच अशा सत्तांसाठी घातक असतो. त्यामुळेच तालिबान्यांनी बुद्धाची मूर्ती तोफा डागून पाडली. भारतात हुसेनच्या चित्रांना विरोध झाला. कला ही मनोरंजनासाठी न राहता ती समाजप्रबोधनासाठी कशी वापरावी याचा आदर्श वस्तूपाठ म्हणजे आजचे हे चित्र प्रदर्शन आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध चित्रकार अन्वर हुसेन म्हणाले की, घरात लावण्यासाठी अमुक चित्र शुभ असते, तमुक चित्र अशुभ असते अशा प्रकारच्या नव्या अंधश्रद्धा पसरवून कलेचा अपमान केला जात आहे हे आम्हां चित्रकारांच्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. कलेचा वापर अंधश्रद्धा पसरवण्यासाठी करू नये असे आवाहन अन्वर हुसेन यांनी केले.

याप्रसंगी पारितोषिक प्राप्त चित्रांच्या बद्दल प्राचार्य बाळासाहेब पाटील यांनी मांडणी केली. तृप्ती भोईर, मुबीन सुतार, दिव्या वारे या चित्रकारांचा सन्मान यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अँड. अजित सूर्यवंशी, व्ही. वाय. आबा पाटील यांची भाषणे झाली.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आर्किटेक्ट प्रमोद चौगुले म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलनावर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून चित्र येतात ही खूप मोठी गोष्ट आहे. या प्रदर्शनातील सर्व चित्र इतकी सुंदर आहेत की प्रत्येकाने ती आपल्या सोशल मीडियावरून दररोज प्रसारित करावी. चित्रकाराने समाजातील अनिष्ट अघोरी प्रथांच्यावर चित्र काढून लोकांचे प्रबोधन करावे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत आम्ही वास्तुशास्त्राविरोधात मोठी मोहीम राबवली होती.

यावेळी ‘करणी’ या विषयावरील चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन महेश कराडकर यांच्या हस्ते काळी बाहुली कापून झाले. या कार्यक्रमास रायगड, नाशिक, हिंगोली, कोल्हापूर सातारा येथून शेकडो चित्रकार उपस्थित होते.

या कार्यक्रमास व्ही. वाय. आबा पाटील, उषा आर्डे सुनील भिंगे, वासुदेव गुरव, अमर खोत, सुजाता म्हेत्रे, स्वाती वंजाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन डॉ. सविता अक्कोळे, आशा धनाले, त्रिशला शहा, श्रीकृष्ण कोरे, गीता ठाकर यांनी केले. तर आभार डॉ. संजय निटवे यांनी मांडले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.