प्रतिष्ठा न्यूज

पूर नियंत्रणासाठी कर्नाटक, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे! सांगलीत श्री गजाननाला साकडे ;कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीतर्फे अनोखे आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली,दि.२३ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कृष्णा खोऱ्यातील महापूर नियंत्रणासाठी सद्बुद्धी दे, असे साकडे आज सांगलीकर नागरिकांच्या वतीने सांगलीचे आराध्य दैवत श्री गजाननाला घालण्यात आले. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या वतीने सांगलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरासमोर हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी आरतीही करण्यात आली.
सांगली, कोल्हापूरसह कृष्णा खोऱ्यातील महापूर नियंत्रणात आणणे ही बाब मुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याच हातात आहे. ना. शिंदे यांनी पाठपुरावा केला तर ना.सिद्धरामय्या अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवू शकतात. त्यामुळे या दोघांना असे प्रयत्न करण्याची श्री गजाननाने सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा, राधानगरीसह सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तसेच मुक्त क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगेने धोक्याची पातळी गाठली आहे तर वारणा त्याच मार्गावर आहे. कृष्णा नदीची पातळीही सतत वाढत आहे. त्यामुळे सांगलीसह मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, कवठेपिरान, भिलवडीसह वाळवा, शिराळा तालुक्याच्या टोकापर्यंत भीतीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथून पाण्याचा विसर्ग वाढवावा. किमान तो साडेतीन लाख क्यूसेक्स करावा अशी मागणी समितीतर्फे वारंवार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनाही तसे निवेदन देण्यात आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कृष्णा खोऱ्यात महापूर येऊ नये म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटकबरोबर सातत्याने समन्वय ठेवून ना. सिद्धरामय्या यांना आरमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यासाठी सतत आग्रह धरावा अशी प्रार्थना श्री गणेशासमोर करण्यात आली. अलमट्टी धरणातील विसर्ग वाढवल्याशिवाय कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्यांचे पाणी कमी होणार नाही. पाऊस असाच वाढत राहिला तर शंभर टक्के महापूर येणार आहे असा इशारा यावेळी देण्यात आला.
या अनोख्या आंदोलनात मंदिरात दर्शनासाठी आलेले नागरिक तसेच परिसरातील विविध व्यावसायिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.यावेळी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार,सुयोग हावळ, मोहन जामदार, नंदकुमार कापसेकर, आप्पा पाटणकर, गजानन चव्हाण, प्रमोद गायकवाड, अनिल पठाडे, शांताराम कदम यांच्यासह नागरिक बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान कृष्णा नदीचे पाणी वाढत असल्याबद्दल खासदार विशाल पाटील यांनीही चिंता व्यक्त केली. ते सध्या लोकसभा अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यांनी तातडीने या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी बोलून कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच कर्नाटक शासनाबरोबरही आपण संपर्क साधू असेही खासदार पाटील म्हणाले.
ते म्हणाले, वास्तविक केंद्र सरकारनेच पुढाकार घेऊन कर्नाटक व महाराष्ट्र यांच्यातील जे अलमट्टीसारखे आंतरराज्य विषय आहेत त्याबाबत समन्वय साधला पाहिजे. तोडगा काढला पाहिजे.
दरम्यान सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही यासंदर्भात कर्नाटकशी संपर्क साधून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.