प्रतिष्ठा न्यूज

कामगारांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 26 : कामगारांना मोठा आधार मिळावा, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे तसेच गोरगरीब कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कामगारांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ कामगारांनी घ्यावा, काही अडचण असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व नाट्यमंदीर मिरज येथे आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, पुणे विभागाचे प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त एम. मुजावर, महाराष्ट्र कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे मानद सदस्य दिलीप जाधव, राज्य गुणवंत कामगार असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, बांधकाम कामगारांसाठी सेफ्टी किट, आरोग्य सेवा, कामगारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य, गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत. कामगारांचा मुलगा डॉक्टर व्हावा, त्याला चांगले शिक्षण मिळावे, त्यांना क्रीडा क्षेत्रात वाव मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार भवन तसेच ईएसआय हॉस्पीटल सुरू करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी सुसज्ज मल्टीपर्पज हॉस्पीटल सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून त्यांनी कामगारांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तूसंच, सुरक्षा व अत्यावश्यक संच, तसेच विविध योजना अंतर्गत लाभार्थी कामगारांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

महाराष्ट्र कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे मानद सदस्य दिलीप जाधव व राज्य गुणवंत कामगार असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले. सूत्रसंचालन मयुरी परब यांनी केले. आभार सहाय्यक कामगार आयुक्त एम. मुजावर यांनी मानले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्त दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी प्रथमोपचार बद्दल डॉ. जी. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे पदाधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.